समग्र विकास हाच माझा संकल्प : वैशालीताई सूर्यवंशी

0
11

मतदारसंघात अवैध व्यवसाय बोकाळले तर, मुली- महिलांची सुरक्षा ऐरणीवर ! नगरदेवळा येथील शेतकरी मेळाव्यात जनतेची सेवा करण्याचे अभिवचन

साईमत/पाचोरा/प्रतिनिधी :

माझे वडील तात्यासाहेब आर. ओ. पाटील यांच्या पावलावर पाऊल ठेवत मतदार संघाचा समग्र विकास करणे हाच माझा संकल्प असल्याचे प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांनी नगरदेवळा येथे आयोजित भव्य शेतकरी मेळाव्यात व्यक्त केला.शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शेतकरी शिवसंवाद यात्रा काढण्यात आली या निमित्ताने नगरदेवळा येथील पाटील मंगल कार्यालयात शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते. याप्रसंगी व्यासपीठावर वैशालीताई सूर्यवंशी, केळी तज्ज्ञ राहुल भारंबे, उध्दव मराठे, रमेश बाफना, राजेंद्र पाटील, राजेंद्र देवरे, बाळु पाटील, अरुण पाटील, ॲड. अभय पाटील, शरद पाटील, जे.के. पाटील, दीपक पाटील, मनोहर चौधरी, अनिल सावंत, अभिषेक खंडेलवाल, योजना पाटील, तिलोत्तमा मौर्य, धर्मा पाटील, अशोक पाटील, रतन परदेशी, पुष्पा परदेशी, भरत खंडेलवाल आदीची उपस्थिती होती.

वैशालीताई सूर्यवंशी मेळाव्याला संबोधित करताना म्हणाल्या की, सध्या शेतकरी केंद्र व राज्य सरकारच्या भ्रष्ट कारभारामुळे भरडला जात आहे. वाढलेला शेती उत्पादन खर्च, हमी भाव, शेत रस्ते, सिंचनाच्या असुविधा यामुळे जनता हैराण असतांना यावर उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. नगरदेवळा सुत गिरणी, कासोदा साखर कारखाना, कजगाव येथील केळीचा माल धक्का, पाचोरा-जामनेर रेल्वे आदी बंद पडले आहेत. गिरणा परिसराची दुर्दशा झालेली असून याचा शेतकऱ्यांना फटका बसला आहे. मात्र कोणत्याही राजकारण्याला याचे देणेघेणे नाही. ते स्वार्थीपणामुळे हातमिळवणी करून जनतेला मूर्ख बनवत आहेत. विधानसभा निवडणूक तोंडावर आल्याचे पाहून कुणी ‘शेतकरीपुत्र’ तर कुणी ‘भूमिपुत्र’ म्हणवून घेतोय. मात्र गेल्या दोन वर्षात त्यांनी शेतकऱ्यांसाठी काही केले नाही. मी स्वत:ला ‘कृषी कन्या’ म्हणवते कारण मी असंख्य शेतकऱ्यांचे ज्वलंत प्रश्न शेताच्या बांधावर जाऊन सोडविते हीच माझ्या वडिलांची शिकवण होती. शेतीला आराध्य दैवत मानून मी शेतकऱ्यांच्या समस्यांना प्राधान्य देते.

मतदारसंघातील अवैध धंदे, मुली व महिलांची सुरक्षा या विषयांवर त्यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. मतदारसंघातील महत्वाची गावे असणाऱ्या नगरदेवळा व पिंपळगाव हरेश्वर आदींसारख्या गावांमधील बाजारपेठेत दुर्दशा आहे. मतदारसंघातील अनेक गावांना पाणीटंचाईचा फटका बसत आहे. बसल्यावरून त्यांनी टिका केली. तसेच तात्यासाहेबांप्रमाणेच आपण भय व भ्रष्टाचारमुक्त समग्र विकासासाठी कटीबध्द असल्याचे म्हणाल्या. जैन इरिगेशनचे केळीतज्ज्ञ राहुल भारंबे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केळी लागवड तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला ग्रामस्थ पुरुष, महिला पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here