साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
मुंबई महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण आणि जळगाव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशाप्रमाणे शुक्रवारी, २२ सप्टेंबर रोजी एच.आय.व्ही. आणि इतर शारीरिकरित्या पसरणारे आजार असलेल्या रुग्णांसाठी मार्गदर्शनानिमित्त चाळीसगाव तालुका विधी सेवा समिती आणि महात्मा फुले आरोग्य संकुल ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिर घेण्यात आले. अध्यक्षस्थानी तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्या.एन.के.वाळके होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते एच.आय.व्ही. आजारासंबंधित माहितीपत्रकाचे अनावरण केले. शिबिरात तालुका विधी सेवा समितीचे समांतर विधी सहाय्यक रमेश पोतदार यांनी स्वरचित कविता सादर केली.
समुपदेशक नामदेव अहिरे, लिंक वर्कर छाया सूर्यवंशी, साने गुरुजी फाउंडेशन, अमळनेर यांनी एच.आय.व्ही. आणि इतर शारीरिकरित्या पसरणारे आजार असलेल्या रुग्णांसाठी मार्गदर्शन केले. वैद्यकीय अधिकारी तथा स्त्रीरोग तज्ज्ञ वैद्यही पंडीत यांनी दुष्काळ, पूर, औद्योगिक आपत्ती आदींमुळे बाधीत झालेल्या लोकांच्या समस्या, कायदेशीर समस्या सामूहिक आपत्तीग्रस्तांसाठी मार्गदर्शन केले. तसेच न्या.एन.के.वाळके यांनी अध्यक्षीय भाषणात ‘सार्वजनिक सेवा आणि केंद्र, राज्य सरकारच्या योजना’ या विषयावर उपस्थित रुग्णांना मार्गदर्शन केले. तसेच उपस्थित रुग्णांशी संवाद साधून ‘एच.आय.व्ही. आणि इतर शारीरिकरित्या पसरणारे आजार’ याविषयी माहिती दिली.
शिबिरात वैद्यकीय अधिकारी श्रीमती पवार यांच्यासह कर्मचारी वृंद तसेच समांतर विधी सहाय्यक देवेश पवार उपस्थित होते. तालुका विधीसेवा समितीतर्फे कार्यक्रमाचे आयोजन वैद्यकीय अधीक्षक वर्ग-१ ग्रामीण रुग्णालय चाळीसगाव डॉ.मंदार करंबळेकर, वरिष्ठ लिपीक डी.के.पवार, शिपाई तुषार भावसार यांनी केले. प्रास्ताविक, सूत्रसंचालन तथा आभार आरोग्य सेवक दीपक ठाकरे यांनी मानले.