Of Hindus : मलकापूरमध्ये ‘एक शाम खाटू वाले के नाम’ कार्यक्रमातून हिंदूंची एकात्मता दृढ

0
10

भव्य धार्मिक कार्यक्रम नूतन शाळेजवळील राजा गणपती मंडळाच्या मैदानावर पार पडला.

साईमत/मलकापूर/ प्रतिनिधी 

मलकापूर शहरात धार्मिक उत्साहाला नवीन उभारी देणारा ‘एक शाम खाटू वाले के नाम’ श्री श्याम बाबा भजन संध्या दरबार व भव्य युवा एकत्रीकरण’ हा भव्य धार्मिक कार्यक्रम नूतन शाळेजवळील राजा गणपती मंडळाच्या मैदानावर पार पडला. कार्यक्रम भक्तिमय आणि संगीतमय वातावरणात रंगला होता. तर उपस्थित भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि संपूर्ण मैदान भक्तीमय घोषणांनी आणि श्याम प्रेमाने दुमदुमून गेले.

सुप्रसिद्ध धार्मिक गायिका कृतिकाजी राठोड यांनी आपल्या मधुर वाणीतील भजने सादर केली. त्यांच्या सुरेल सादरीकरणातून उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. कार्यक्रमात बाबा खाटू शाम यांची प्रतिमा उभारण्यात आली. ज्योत पेटवून आरती पार पडली. भाविकांनी रांगेत उभे राहून बाबा खाटू शामांचे दर्शन घेतले. महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.

भजन संध्या दरबाराचे आयोजन निवडणुकीतील अपक्ष नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आशिष माहुरकर आणि त्यांच्या मित्र परिवाराने केले. त्यांनी हिंदू बांधवांची एकात्मता दृढ करण्यासाठी विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करत हिंदुत्वाचा जागर करण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रमाद्वारे उपस्थितांना श्रद्धा, भक्ती आणि एकात्मतेचा अनुभव मिळाला. तर हिंदू बांधवांच्या मतांची मोट बांधण्याचेही चित्र स्पष्ट झाले.

कार्यक्रमाने धार्मिक वातावरणात एक सुंदर संगम तयार केला. ज्यामध्ये भक्ती, श्रद्धा आणि युवा एकत्रीकरणाचा अनुभव घेता आला. या कार्यक्रमामुळे मलकापूर शहरातील धार्मिक उत्साह आणि एकात्मतेला नवे जीवन मिळाले, तर सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here