सप्टेंबरचे वेतन अदा न झाल्यास जुक्टो संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात
साईमत/जळगाव/प्रतिनिधी
जिल्ह्यातील उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे सप्टेंबरचे वेतन अद्यापही अदा न झाल्याने नवरात्र, दसऱ्यासारख्या आनंदाच्या सणांवर विरजण पडले आहे. परिणामी शिक्षक वर्गात मोठ्या प्रमाणावर नाराजी निर्माण झालेली आहे. जिल्ह्यातील दोन हजारपेक्षा अधिक शिक्षक ऑक्टोबर महिन्याची १५ तारीख उलटून गेल्यावरही सप्टेंबरच्या वेतनापासून वंचित आहेत. वेतनासाठी वेतन पथक कार्यालयात वारंवार संपर्क साधून माहिती घेतली जात आहे. राज्यातील इतर जिल्ह्यात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ऑक्टोबरचे वेतन अदा करण्याबाबत संबंधित वेतन पथक कार्यालयांचे पत्र निर्गमित केले आहे. असे असताना जळगाव जिल्ह्यासाठी मात्र सप्टेंबरचे वेतनासाठी अत्यावश्यक २२ कोटी रुपयांची तरतूद अद्यापही न झाल्याने आज अखेरही वेतन जमा न झाल्याने शिक्षक वर्गात प्रचंड अस्वस्थता निर्माण झालेली आहे. असेच चित्र कायम राहिल्यास दिवाळीसारखा आनंदाचा दीपोत्सवही अंधारात जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. ह्या आठवड्यात वेतन न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने दिला आहे.
नाशिक विभागाचे पदवीधर आमदार सत्यजित तांबे, शिक्षक आमदार सर्वश्री किशोर दराडे, किरण सरनाईक, विक्रम काळे यांनी व्यक्तिगत लक्ष घालून जिल्ह्यासाठी अनुदानाची तरतूद करवून घ्यावी, अशी आग्रही मागणी प्रा.नंदन वळींकार, प्रा.सुनील सोनार, प्रा.सुनील गरुड, प्रा. डी.डी.पाटील, डॉ.अतुल इंगळे, प्रा.गजानन वंजारी, प्रा.राहुल वराडे, प्रा.सुधाकर ठाकूर, प्रा.राजेंद्र चव्हाण, प्रा.राजेंद्र तायडे, प्रा.शैलेश राणे, प्रा.सुनील पाटील, प्रा. पी.पी.पाटील यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.