साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
जीवन जगताना बालपण, तरूणपण, म्हातारपण आनंदाने आणि समाधानाने जगा. गोरगरीब, गरजवंतांना मदत करा, एखादा मुलगा हुशार आहे मात्र त्याच्याकडे शिक्षणासाठी पैसे नाही अश्या विद्यार्थ्याला शिक्षणासाठी मदत करा, असे पंडित प्रदीप मिश्रा यांनी खा.उन्मेष पाटील आणि संपदा पाटील आयोजित शिवमहापुराण कथेच्या चौथ्या दिवशी सांगितले. यावेळी राज्याचे कॅबीनेट मंत्री ना.गिरीष महाजन यांनी कथास्थळी भेट देऊन प्रदीप मिश्रा यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी खा.उन्मेष पाटील, आ.मंगेश चव्हाण उपस्थित होते.
माणसाला मिळालेले आयुष्य हे फार सुंदर आहे. ते आयुष्य जगण्याची कला आपल्या अंगी असली पाहिजे. परमेश्वराने आपल्याला मानव जन्म दिला. या मानव जन्माला व्यर्थ घालवू नका. आयुष्यभरात जी कमाई कराल, त्या कमाईचा स्वतःवरील आनंदावर खर्च करा आणि तो खर्च करीत असताना समाजातील गरजवंतांनाही मदत करा. हीच खरी ईश्वरसेवा असल्याचे सांगितले. तसेच एखाद्या गरीब व्याधीने ग्रासलेला आहे. अश्या रूग्णाला औषधासाठी मदत करा. ज्यावेळी तुम्ही गोरगरिब व दीनदुबळ्यांना मदत करतात. त्यावेळी ती सेवा महादेवापर्यंत पोहचते. तहानलेल्यांना पाणी, भुकेलेल्यांना जेवण दिल्यावर तुम्हाला परिवाराची चिंता करण्याची गरज भासणार नाही. कारण अश्यांच्या पाठीशी महादेव राहतात, असेही त्यांनी सांगितले. तसेच आनंदी जीवन जगण्याचे आवाहन भाविकांना केले. शिवपुराण कथेमुळे भाविकांना आलेल्या अनुभवाच्या पत्रांचे वाचन पंडित प्रसाद मिश्रा यांनी केले. पशुनाथ व्रत कसे करावे, त्याची माहितीही त्यांनी भाविकांना दिली.
