साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
अखिल भारतीय ग्राहक पंचायत ही उज्ज्वल परंपरा असलेली संघटना आपले यावर्षी सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. त्यासाठी अमळनेर येथे तातडीची आढावा बैठकीचे आयोजन केले होते. त्यात जोरदार तयारी आणि जिल्हाध्यक्षांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष डॉ.अनिल देशमुख, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद सदस्य नरेंद्र पाटील, जिल्हा उपाध्यक्ष दिनेश तायडे, जिल्हा सचिव ॲड.सुभाष तायडे, तालुका पालक मकसुद बोहरी, तालुकाध्यक्ष तथा प्रांत महिला प्रमुख ॲड.भारती अग्रवाल, उपाध्यक्ष स्मिता चंद्रात्रे, सहसचिव ज्योती भावसार, कोषाध्यक्ष वनश्री अमृतकर, श्रीमती विमल मैराळे, रोटेरियन नूतन सदस्य महेश पाटील, साहित्य लेखक तथा कवी गोकुळ बागुल, शांतीलाल रायसोनी, पी.आर.ओ. जयंतीलाल वानखेडे आदी मान्यवर उपस्थित होते.
सभेत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ग्राहक तीर्थ नानासाहेब बिंदू माधव जोशी यांच्या प्रतिमेच पूजन करुन माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर अमळनेर तालुक्याचे माजी आमदार खान्देश मुलुख मैदान तोफ म्हणून सर्व महाराष्ट्राला परिचित असलेले दिवंगत कै. साथी बापूसाहेब गुलाबराव पाटील यांचे निधन झाल्याने त्यांच्या असंख्य स्मृतींना उजाळा देत जिल्हाध्यक्ष डॉ.अनिल देशमुख यांनी मनोगत व्यक्त करत त्यांना सर्व उपस्थितांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
नवीन सभासद जोडण्याचे आवाहन
तालुकाध्यक्ष ॲड.भारती अग्रवाल यांनी अमळनेर तालुक्याचे सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त करावयाच्या कामाचा अहवाल सादर केला. बैठकीत डॉ.अनिल देशमुख यांनी नूतन सदस्यता नोंदणी, संकलन निधी व स्मरणिका जाहिरात तसेच अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त ८ सप्टेंबर ते १० सप्टेंबर २०२३ या दिवशी राष्ट्रीय स्तरावरील अधिवेशन तसेच मध्य महाराष्ट्र प्रांत यांचे ओझर, ता.जुन्नर येथील आयोजित अधिवेशन, त्या संबंधीचे दायित्व कार्य, अखिल भारती ग्राहक पंचायतची एकंदरीत सर्व कार्यप्रणाली यावर सविस्तर मार्गदर्शन केले. अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर तालुक्याचे कार्याबद्दल समाधान व्यक्त करत प्रत्येक सभासदांनी नूतन दहा अभ्यासू व जिज्ञासू सदस्य जोडावेत. ह्या सुवर्ण महोत्सवी वर्षात जास्त नवीन सभासद जोडावेत, असेही त्यांनी आवाहन केले. बँक सायबर क्राईम समिती प्रमुख विजय शुक्ला यांनी ग्राहक हितार्थ कार्याचा, परिवहन, भूमापन विभाग, वीज महावितरण आदी स्तरावर केलेल्या कार्याचा प्रगती आलेख नमूद करीत अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे नियुक्तीपत्र, आय कार्ड, सर्व पदाधिकारी यांचा नामोल्लेख असलेले लेटर हेडची मागणी करत प्रस्ताव मांडला.
पंतप्रधानाच्या अभिनंदनाचा ठराव
भारतीय चांद्रयान -३ चे चंद्रावर अर्थात दक्षिण ध्रुवावर इस्त्रोने अगदी अलगदपणे उतरविला. त्याबद्दल अथक परिश्रम घेतलेले थोर शास्त्रज्ञ व त्यांना प्रोत्साहन देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदनाचा ठराव मकसूद बोहरी यांनी मांडला. त्यास सर्वच उपस्थितांनी उत्स्फूर्त टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद देत अनुमोदन दिले. प्रास्ताविक अमळनेर तालुका पालक तथा जिल्हा सहसंघटक मकसूद बोहरी, सूत्रसंचलन वनश्री अमृतकर, आभार सहसचिव ज्योती भावसार यांनी मानले.