Heart-Wrenching : हृदयद्रावक : विसर्जनावेळी आईसह बहिणीच्या डोळ्यादेखत तरुण वाहून गेला

0
17

निमखेडी रेल्वे पुलाजवळील घटना ; अग्निशमन दलाचा प्रयत्न व्यर्थ ; आईचा आक्रोश हृदयद्रावक

साईमत/जळगाव/पाळधी, ता.धरणगाव/वार्ताहर :  

दुर्गा देवीच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी गेलेला तरुण पाय घसरून वाहून गेल्याची धक्कादायक घटना शहरातील निमखेडी शिवारातील रेल्वे पुलाजवळ तसेच बांभोरीच्या दिशेने असलेल्या गिरणा नदीत शुक्रवारी, ३ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतरही तरुण मिळून आला नाही. त्यामुळे शोध मोहीम थांबवावी लागली. दरम्यान, बेपत्ता झालेल्या तरुणाचे हिमेश संतोष पाटील (वय १९, रा. मयुरेश्वर कॉलनी, दादावाडी परिसर, जळगाव) असे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, हिमेश हा आपल्या आई-बहिणीसह राहत होता. शुक्रवारी सकाळी साडे अकरा वाजता आई-बहिणीसोबत मूर्ती विसर्जनासाठी तो निमखेडी रेल्वे पुलाजवळ गेला होता. दुपारी बारा वाजेच्या सुमारास त्याने देवीमातेच्या मूर्तीचे विसर्जन केले. त्यानंतर पाय घसरून तो नदीपात्रात कोसळला आणि पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. ही घटना घटनास्थळी उपस्थित आई आणि बहिणीच्या डोळ्यासमोर घडल्याने त्यांनी केलेला आक्रोश मन हेलावणारा होता. त्यानंतर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बचावकार्य सुरू केले. पुलाखाली तसेच बांभोरीच्या दिशेने नवीन हायवे परिसरातही शोध घेतला. मात्र, हिमेश कुठेही सापडला नाही. सायंकाळी अंधार पडल्यामुळे शोध मोहीम थांबविण्यात आली.

दादावाडी परिसरातील मयुरेश्वर कॉलनीत शोककळा

शोधकार्यात अग्निशमन दलाचे अधिकारी शशिकांत बारी यांच्या मार्गदर्शनाखाली वाहन चालक देविदास सुरवाडे, संतोष तायडे, महेश पाटील, रवी भोई, रोहिदास चौधरी, संदीप कोळी यांच्यासह सर्पमित्र जगदीश बैरागी यांनीही सहभाग घेतला. या घटनेमुळे संपूर्ण दादावाडी परिसरातील मयुरेश्वर कॉलनीत शोककळा पसरली असून नागरिकांमधून हळहळ व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here