विकास आराखडा तयार करण्यासाठी नागरिकांच्या हरकतींवर सुनावणी

0
14

साईमत/ न्यूज नेटवर्क/मुक्ताईनगर :

नगरपंचायतीचा मुक्ताईनगर शहर विकास आराखडा अद्यापही मंजुरीसाठी प्रस्तावित आहे. शहर विकास आराखडा अंतर्गत ग्रीन झोन आणि येलो झोन अंतर्गत येणाऱ्या सुमारे ७६ नागरिकांनी हरकती घेतल्या होत्या. ४ व ५ जुलै रोजी मुक्ताईनगर नगरपंचायतमध्ये नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांसह मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांनी ७३ नागरिकांची बैठक घेऊन नगरपालिकेत सुनावणी केली. नागरिकांनी मुक्ताईनगर शहर विकास आराखडाविषयी आपले म्हणणे मांडले. तसेच योग्य कागदपत्रे दिली व अधिकाऱ्यांनी नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले.

संत मुक्ताईच्या पदस्पर्शाने पावन झालेले संत भूमी तिर्थक्षेत्र मुक्ताईनगर नगरपंचायत हद्यीत असून येथे वारकरी संप्रदायातील संत ज्ञानेश्वरादी चौघे भावंडातील संत मुक्ताबाई या अंतर्धान झाल्याने, त्यांचे मुक्ताईनगर शहराजवळच समाधी स्थळ आहे. शहरात नगरपंचायत हद्दीत संत मुक्ताईचे ऐतिहासिक असे मंदिर येथे असल्याने दर पंधरवाडी व महिन्याच्या एकादशीला दर्शनासाठी लाखो भाविक-भक्त तसेच शेकडो पायी दिंडी सोहळे दर्शनासाठी येत असतात. सोबतच या भूमीला ऐतिहासिक वारसा लाभलेला असल्याने दररोज असंख्य पर्यटकांची वर्दळ नेहमी असते. त्यामुळे हा ऐतिहासिक वारसा जोपासण्यासाठी तसेच हे तिर्थक्षेत्र शहरात असल्याने शहराचा विकास होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे तिर्थक्षेत्र मुक्ताईनगर शहराचा विकास आराखडा तयार करण्यासाठी जेनोलीथ जळगाव कंसल्टन्सीची नेमणूक केलेली आहे.

शहर विकास आराखडामधील ग्रीन झोनमध्ये शेती येत आहे. त्यामध्ये रहिवास सोडून बहुतांश तो वापर ग्रीन झोनमध्ये येत असतो. येलो झोनमध्ये अनारक्षित शेती एन ए झालेले प्लॉट्स रहिवास परवानगीसाठी आहेत. मुक्ताईनगर शहर विकास आराखड्यामध्ये प्ले ग्राउंड, शाळा, दुकाने, बगीचे, नगरपंचायतीची स्वतःची इमारत, नगरपंचायत कर्मचाऱ्यांचे निवासस्थान, आरोग्य आदी विषयांचा समावेश केला आहे. शक्यतोवर सरकारी जागेवर ठेवण्याचा प्रयत्न नगरपंचायतीचा आहे. याप्रसंगी नगरपंचायतीत सेवानिवृत्त सहाय्यक संचालक नगर रचना नाशिक येथील विलास पाटील, जळगावचे सेवानिवृत्त नगर रचनाकार रामदास वाणी, भुसावळचे अनुज्ञापीधारक अभियंता वामन चौधरी, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी गजानन तायडे उपस्थित होते.

चौथ्या टप्प्याचे पुनर्वसन अंतिम टप्प्यात

मुक्ताईनगर शहरातील चौथ्या टप्प्याचे पुनर्वसन अंतिम टप्प्यात आहे. मुक्ताईनगर नगरपंचायत तयार करीत असलेल्या शहर विकास आराखड्यामध्ये चौथ्या पुनर्वसन टप्प्याविषयी महसूल विभागाकडून कुठलाही पत्रव्यवहार नसल्याचे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी गजानन तायडे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here