वरणगाव बायपास मार्गे जाणाऱ्या बस चालकाची कानउघाडणी

0
12

साईमत, वरणगाव : प्रतिनिधी

शहरात लांब पल्ल्याच्या बसेसला थांबा असुनही बसेस शहराच्या बायपास मार्गे मार्गक्रमण करीत असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत होता. त्याची दखल घेऊन माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी सोमवारी, २७ नोव्हेंबर रोजी कार्यकर्त्यांसह महामार्गावर जाऊन बायपास जाणारी बस थांबवून चालकाला धारेवर धरीत शासनाच्या आदेशाची प्रत देऊन चांगलीच कानउघाडणी केली.

वरणगाव शहराची किमान ६० हजार लोकसंख्या तसेच शहराला लगतचे आयुध निर्माणी, दीपनगर औष्णिक वीज निर्मिती केंद्र व परिसरातील २७ खेड्यातील प्रवाशी नागरिकांना लांब पल्ल्याच्या गावी जाण्यासाठी सुपर फास्ट बसेसला वरणगाव शहरात माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या मागणीवरून थांबा देण्यात आला आहे. याबाबत त्यांनी ग्रामविकास व पर्यटन मंत्री ना. गिरीष महाजन यांनाही निवेदन दिले होते. त्यानुसार ना. महाजन यांच्या सुचनेनुसार परिवहन महामंडळाचे जिल्हा विभाग नियत्रंक यांनी दक्षता घेऊन जिल्ह्यातील आगार प्रमुख तसेच नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, नाशिक, धुळे अशा विभाग नियंत्रकांना आपआपल्या आगारातून वरणगावमार्गे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या बसेस प्रवाशांच्या सोयीसाठी शहरातून वळविण्यात याव्या, असे पत्राद्वारे कळविले आहे. मात्र, असे असुनही बहुतांश लांब पल्ल्याच्या बसेस वरणगाव येथील प्रवाशांना न बसविता बायपास मार्गे मार्गक्रमण करीत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत होती. त्याची सोमवारी माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी दखल घेऊन दुपारी एक वाजता कार्यकर्त्यांसह फुलगाव बायपास महामार्गावर पाळत ठेवली. तेव्हा धुळे आगाराची शिंदखेडा-अकोला ही बस (क्र. एम.एच. १४ / बीटी – २११३) चालकाने वरणगावकडे न वळविता बायपास मार्गे नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी माजी नगराध्यक्ष काळे आणि त्यांच्या समर्थकांनी ही बस थांबवुन चालकाची चांगलीच कान उघाडणी केल्याने चालकाने क्षमा मागितली. तसेच चालकाला विभाग नियंत्रकांच्या आदेशाची प्रत देण्यात आली.

या बसेसही धावतात बायपास

लांब पल्ल्याच्या बसेस वरणगाव मार्गे वळविण्याचे विभाग नियत्रकांचे आदेश असतांना सुद्धा नागपूर, छत्रपती संभाजी नगर, राळेगाव, चाळीसगाव आगाराच्या बसेसवरील मुजोर चालक वरणगावातील प्रवाशांची उचल न करता बायपास मार्गे थेट मुक्ताईनगर गाठत असल्याचेही समोर आले आहे. याबाबतची नोंद भुसावळ आगार प्रमुखांनी फुलगावजवळील बायपास महामार्गावर नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्याने नोंदवहीत केली आहे.

तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा

शहर व परिसरातील असंख्य प्रवाशी अकोला, अमरावती, नागपूर, बुलढाणा, छत्रपती संभाजी नगर, पुणे, धुळे, नाशिक अशा ठिकाणी तसेच या मार्गावरील मोठ्या गावाकडे प्रवासाला जातात. मात्र, विभाग नियत्रकांचे आदेश असतानांही मुजोर चालक बायपास मार्गे बस नेत असल्याने प्रवाशांचे हाल होतात. त्यामुळे बस चालकांनी दक्षता न घेतल्यास यापुढे तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल, असा इशारा सुनील काळे यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here