साईमत प्रतिनिधी – “सेवा पंधरवडा २०२५” अंतर्गत देशभरात महिलांच्या आरोग्याबाबत जनजागृती व उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या “स्वस्थ नारी – सशक्त परिवार अभियानाचा” शुभारंभ आज मध्यप्रदेशातील धार येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला.
या उपक्रमाच्या अनुषंगाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश (राजूमामा) भोळे, भाजपा पश्चिम जिल्हाध्यक्ष राधेश्याम चौधरी, माजी महापौर सीमा भोळे, रजनी सावकारे, भैरवी वाघ-पलांडे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, डॉ. इंद्राणी मिश्रा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील, वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.
अभियानाची वैशिष्ट्ये
हे अभियान केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचा महत्वाचा उपक्रम असून महिला व बाल विकास मंत्रालय त्यात सहकार्य करत आहे. देशभरात महिलांसाठी आणि बालकांसाठी आरोग्य सेवा मजबूत करणे, गुणवत्तेत सुधारणा करणे आणि आरोग्याविषयी जागरूकता वाढवणे हे या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
या मोहिमेअंतर्गत २ ऑक्टोबर गांधी जयंतीपर्यंत देशभरात तब्बल १ लाख आरोग्य शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. आयुष्मान आरोग्य मंदिरे, प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच विविध आरोग्य सुविधा केंद्रांमध्ये ही शिबिरे भरतील. विशेषतः महिला व बालकांच्या आरोग्य गरजा, पोषण, प्रसूतिपूर्व काळजी, मातामृत्यू व बालमृत्यू रोखणे, तसेच एकूणच कुटुंबाच्या आरोग्याबाबत जनजागृती करणे या उद्देशाने हा कार्यक्रम राबवला जात आहे.
सरकारच्या “सेवा हाच संकल्प – भारत हीच पहिली प्रेरणा” या ब्रीदवाक्याला अनुसरून आरोग्यदायी समाज निर्मितीसाठी हा अभियानात्मक उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.