जी. एम. फाउंडेशन, खान्देश केटरिंग असोसिएशनचा स्तुत्य उपक्रम
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
येथील जी. एम. फाउंडेशन आणि खान्देश केटरिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष यांच्या सहकार्याने पंडित प्रदीप मिश्रा यांच्या जन्मदिनानिमित्त मुख्यमंत्री सामुदायिक मोफत आरोग्य तपासणी शिबीर आणि रक्तदान शिबीर आयोजित केले होते. शिबिरात ५२५ नागरिकांची विविध तज्ज्ञ डॉक्टरांच्या हस्ते तपासणी करण्यात आली. तसेच ६० जणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
शिबिराला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील, जी. एम फाउंडेशनचे आरोग्यदूत पितांबर भावसार, खान्देश केटरिंग असोसिएशनचे अध्यक्ष सत्यनारायण जोशी, उपाध्यक्ष गोपाल अग्रवाल, सचिव रतन सारस्वत उपस्थित होते. सुरुवातीला डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पूज्य पंडित प्रदीप मिश्रा यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून रक्तदान आणि आरोग्य तपासणी घेतले जात असल्याचे सारस्वत यांनी सांगितले.
आरोग्य तपासणीमुळे नागरिकांना वेळीच आजारांची माहिती मिळते. त्यामुळे त्यांना वेळेवर उपचार घेता येतात. शिबिराचा लाभ सर्व घटकातील नागरिकांनी घ्यावा, असे प्रतिपादन डॉ. किरण पाटील यांनी केले. डॉ. किरण पाटील यांच्यासह मान्यवरांनी आरोग्य तपासणी सुरु असलेल्या विभागांना भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. शिबिरात नागरिकांची कान-नाक-घसा, डोळे, बीपी, रक्त, जनरल, स्त्रीरोग, त्वचाविकार, दंतरोग यासह विविध तपासण्या शिबिरात केल्या. ज्यांना शस्त्रक्रिया सांगितल्या आहेत, त्या सर्व योजनांमधून मोफत केल्या जाणार असल्याचे सांगण्यात आले.
ऑनलाईन स्क्रिनवर पंडित मिश्रांनी साधला भाविकांशी संवाद
कार्यक्रमात पंडित मिश्रा यांनी ऑनलाईन स्क्रिनवर भाविकांशी संवाद साधला. भक्तांनी समाजात गरजूंची सेवा करीत रहा, असे आवाहन भक्तांना केले. शिबिराला विठ्ठलेश सेवा समिती, सिहोर येथील आणि महाराष्ट्राचे काम पाहणारे देविदास पाटील, राजेश सोनवणे, ममता माळी यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते. यशस्वीतेसाठी खान्देश केटरिंग असोसिएशनचे सहसचिव दिनेश टाटीया, खजिनदार राजेंद्र वैष्णव यांच्यासह सदस्यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक सचिव रतन सारस्वत यांनी केले.