साईमत / कर्नाटक
कर्नाटकातील विजयपूर जिल्ह्यातील सिंदगी तालुक्यात आज अंगावर काटा आणणारी भीषण दुर्घटना घडली. कन्नोळी टोलगेटजवळ सरकारी बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या समोरासमोर धडकेनंतर बसला आग लागल्याने एक युवक जिवंत जळून मृत्यूमुखी पडला.
मिळालेल्या माहितीनुसार, समोरून येणाऱ्या दुचाकीला बसने जोरदार धडक दिली. या धडकेची तीव्रता इतकी होती की दुचाकीच्या पेट्रोल टँकचा स्फोट होऊन तात्काळ आग लागली. यात देवऱ्हिप्परगी तालुक्यातील मुळसावळगी गावचा रहिवासी अभिषेक सायबागौडा नागराळ (वय २२) हा युवक आगीच्या ज्वाळांत सापडून घटनास्थळीच जिवंत जळाला.
अपघातानंतर काही क्षणांतच आगीने भीषण रूप धारण करत बसलाही वेढले. मात्र, चालकाच्या प्रसंगावधानामुळे आणि प्रवाशांनी वेळीच बसमधून बाहेर पडल्याने मोठी जीवितहानी टळली. बसमधील सर्व प्रवासी सुरक्षित बचावले असल्याची माहिती मिळाली आहे. घटनेची माहिती मिळताच सिंदगी येथील अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली. या प्रकरणी सिंदगी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलिसांनी घटनेचा पुढील तपास सुरू केला आहे.
