साईमत, जळगाव : प्रतिनिधी
गेल्या अनेक वर्षापासून शेती आणि शेतकरी यांच्यासाठी मी काम करत आलो आहे. पण गेल्या काही वर्षापासून जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पीक विम्याचे प्रश्न, भाववाढीचे प्रश्न सुटत नाही, वेळोवेळी आंदोलन करूनही प्रशासन शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय घेत नसल्याचे दुःख आहे. त्यामुळे मी माझे उर्वरित आयुष्यात शेतकऱ्यांच्या हितासाठीच काम करणार असल्याचा निर्णय माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी जाहीर केला.
वाढदिवसाच्या कार्यक्रमाची सुरुवात गुलाबराव देवकर यांच्या हस्ते बळीराजाच्या प्रतिमेचे व नांगराचे पूजन करून करण्यात आली. शेतकऱ्यांचा राजा हा बळीराजा असून कृषी परंपरेचे प्रतीक म्हणजे नांगर आहे, हे नांगर कष्टाचं, शेती फुलविण्याचे प्रतीक आहे. नांगराची पूजा करून गुलाबराव देवकर यांनी वाढदिवसाच्या दिवशी शपथ घेत जाहीर केलं की आजवरच्या राजकीय जीवनात शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करत आलो आहे. परंतु यापुढे मात्र शेतकऱ्यांसाठीच जगायचे आणि शेतकऱ्यांच्या हितासाठीच आयुष्यभर राबायचे, असा निर्णय देवकर यांनी जाहीर केला.
यावेळी मतदारसंघातील अनेक कार्यकर्ते व सहकारी उपस्थित होते. जळगाव जिल्हा मजूर फेडरेशनच्या आवारात झालेल्या या वाढदिवसाच्या कार्यक्रमाची सुरुवातच वेगवेगळ्या पद्धतीने करण्यात आली. गुलाबराव देवकर यांना वाढदिवसानिमित्त ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री सुरेशदादा जैन, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, युवक अध्यक्ष महबूब शेख, आ. राजू मामा भोळे, माजी आमदार राजीव देशमुख यांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या. जळगाव जिल्ह्यातील व जळगाव ग्रामीण मतदार संघातील शेकडो कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष भेटीला येऊन शुभेच्छा दिल्या.