बदलीचे कारण गुलदस्तात, राजकीय क्षेत्रात चर्चेला उधाण
साईमत/वरणगाव/प्रतिनिधी :
वरणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत यशवंत चौधरी यांची शुक्रवारी तडकाफडकी बदली झाली आहे. वर्षभराच्या कालावधीतच नेमकी कोणत्या कारणामुळे बदली झाली, त्याचे कारण पोलीस प्रशासनाकडून स्पष्ट झाले नसले तरी वर्षभरातील कारकीर्द आर्थिक देवाण – घेवाण, गुन्ह्यांचा तपास, विनाकारण शासकीय कामात अडथळा आणण्याबाबत गुन्हा दाखल करणे अशा अनेक कारणांमुळे त्यांच्या बाबतीत वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत तक्रारी गेल्या होत्या. त्यामुळे त्यांची अचानक बदली झाल्याने राजकीय क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे.
सविस्तर असे की, वरणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिषकुमार आडसुळ यांची आपल्या चांगल्या कारकिर्दीमुळे तब्बल साडेतीन वर्षांनी म्हणजेच ३० नोव्हेंबर २०२३ रोजी बदली झाली. त्यानंतर जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत यशवंत चौधरी यांच्याकडे वरणगाव पोलीस ठाण्याचा पदभार सोपविण्यात आला. मात्र, त्यांनी पदभार स्विकारताच शहर व पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या परिसरात आपल्या कायद्याचा दंडका उगारून शासकीय कामात अडथळा आणणे असे किमान चार गुन्हे दाखल केले. तसेच शहरातील अवैध धंदे चालकांवर वचक निर्माण करून त्यांच्याशी आर्थिक देवाण – घेवाणचे विषय, राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना अपमानास्पद वागणूक, चोरीच्या व खुनाच्या घटनांमध्ये झालेली वाढ यासह त्यांच्या विरोधात राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला असल्याची कारणे पुढे येत आहेत.
राजकीय षडयंत्राचे ठरले बळी
वरिष्ठ स्तरावरून दखल घेऊन त्यांची तडका – फडकी बदली झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली असली तरी बदलीचे खरे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. त्यांच्या जागेवर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जनार्दन खंडेराव यांची नियुक्ती झाली आहे. सहायक पोलीस निरीक्षक भरत यशवंत चौधरी यांनीही माझी बदली झाली असल्याच्या विषयाला दुजोरा दिला आहे. नवनियुक्त एपीआय जनार्दन खंडेराव यांनी सायंकाळी अवघ्या दहा मिनिटात पदभार घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली. दुसरीकडे भरत चौधरी हे राजकीय षडयंत्राचे बळी ठरल्यानेच त्यांची तडका फडकी बदली झाल्याची चर्चाही सुरू झाली आहे.त्यांच्या बदलीचे खरे कारण गुलदस्त्यात आहे.