साईमत, धरणगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील पष्टाणे येथील माहेरी आलेल्या विवाहितेला ५ लाखांची मागणी करत मारहाण करत जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी शनिवारी, २३ सप्टेंबर रोजी धरणगाव पोलीस ठाण्यात सासरच्या पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर असे की, धरणगाव तालुक्यातील पष्टाणे येथील माहेर असलेल्या दामिनी मुकेश चव्हाण (वय २४) यांचा गुजरात राज्यातील उधना येथील मुकेश सुभाष चव्हाण यांच्यासोबत रितीरिवाजानुसार विवाह झाला आहे. लग्नाच्या सुरूवातीचे दिवस चांगले गेल्यानंतर पती मुकेश याने विवाहितेला पाच लाखांची मागणी केली. विवाहितेने पैशांची पूर्तता न केल्याच्या रागातून तिला बेदम मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिली. तसेच सासरे, सासू आणि नणंद यांनीही पैशांसाठी शिवीगाळ करत मानसिक त्रास दिला. हा प्रकार सहन न झाल्याने विवाहिता माहेरी निघून गेली. विवाहितेने शनिवारी सायंकाळी ६ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पती मुकेश सुभाष चव्हाण, सासरे सुभाष सिताराम चव्हाण, सासू कलाबाई सुभाष चौधरी, नणंद रोशनी नितीन खरकार आणि भारती योगेश वाघ (सर्व रा. उधना, सुरत, राज्य गुजरात) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तपास पो.हे.कॉ.चंदूलाल सोनवणे करीत आहे.