जिल्ह्यात पोलीस, राज्य उत्पादन शुल्क विभागाची हातभट्टी निर्मूलन मोहीम

0
19
जिल्ह्यात पोलीस, राज्य उत्पादन शुल्क विभागाची हातभट्टी निर्मूलन मोहीम एका दिवसात 106 गुन्हे, 27 लाख 55 हजारांचा मुद्देमाल जप्त -www.saimatlive.com

साईमत जळगाव प्रतिनिधी

राज्य उत्पादन शुल्क व पोलीस विभागाने जिल्ह्यात संयुक्तपणे हातभट्टी दारू निर्मूलन मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. मोहिमेत मंगळवारी, 7 नोव्हेंबर रोजी एकाच दिवसात 106 गुन्हे दाखल केले आहेत. त्यात 100 आरोपींना अटक केली आहे. त्यातून 27 लाख 55 हजार 555 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, विभागीय उपायुक्त बी.एच.तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात हातभट्टी निर्मिती व वाहतूक करणाऱ्या विरोधात धडक मोहीम राबविण्यात येत आहे.

मोहिमेत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा अधीक्षक व्ही.टी.भुकन यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सर्व पथके, नाशिक विभागीय भरारी पथक (कळवण) तसेच जळगाव पोलीस विभागांच्या पथकाने संयुक्तरित्या कारवाई केली. हातभट्टी निर्मूलन मोहिमेत राज्य उत्पादन शुल्क विभागाने 40 व पोलीस विभागाने 66 असे 106 गुन्हे नोंदविले आहेत. याप्रकरणी 100 जणांना अटक केली आहे. उर्वरित 6 जण फरार झाले आहेत.

जामनेर तालुक्यातील सामरोद येथे गावठी हातभट्टी फोडण्यासाठी थेट अधीक्षक व्ही.टी.भुकन त्यांच्या पथकासह पोहोचले होते. यामध्ये अवैध गावठी दारू निर्मिती तसेच विक्री करणाऱ्यावर 4 गुन्हे दाखल करत 4 हजार 740 लिटर रसायन तसेच 90 लिटर तयार गावठी दारू असा 1 लाख 15 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई चाळीसगाव येथील निरीक्षक आर. जे.पाटील तसेच पाचोरा विभागाचे विलास पाटील यांच्यासोबत पोलीस कॉन्स्टेबल गिरीश पाटील, विजय परदेशी, संतोष निकम, मुकेश पाटील, विपुल राजपूत यांनी मिळून केली.

मागील 4 महिन्यात हातभट्टीसह अवैध मद्यविक्रीवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. तसेच 3 सराईत आरोपींना एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्ध केले आहे. राज्य उत्पादन शुल्क व पोलीस विभागाची अवैध मद्य विक्रीवरील कारवाईचे सत्र आगामी काळातही सुरुच राहणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाकडून देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here