माजी विद्यार्थ्यांच्या कृतज्ञतेने भारावले गुरुजन; दाटून आला कंठ

0
15

साईमत, जामनेर : प्रतिनिधी

तालुक्यातील पहूर येथील आर.टी.लेले हायस्कुलमध्ये तब्बल २५ वर्षानंतर १९९८ -९९ च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन आपल्या गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. या कृतज्ञतेने गुरुजनांना अक्षरशः भारावून आले, बोलताना त्यांचा कंठ दाटून आला. पहूर गु्रप सोसायटी संचलित आर.टी.लेले हायस्कूलच्या १९९८ – ९९ च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र येऊन रौप्य महोत्सवी कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त शिक्षक वाय. एस. पाटील होते.

याप्रसंगी निवृत्त मुख्याध्यापक एस. एस. गावंडे, व्ही. एन. पाटील, सी. टी. पाटील, आर. बी. पाटील, विजय बोरसे यांनी मार्गदर्शन केले. एस. एस. गावंडे यांना तर विद्यार्थ्यांशी बोलताना गहिवरून आले. यावेळी निवृत्त मुख्याध्यापक व्ही. के. बडगुजर, मधुकर बोरसे, ए.पी. पाटील, मुख्याध्यापक एस. व्ही. पाटील, पर्यवेक्षक एस. आर. सोनवणे, मधुकर पवार, आर. एम. कलाल, थोरात सर, आर. टी. देशमुख, डॉ. ज्योती चौधरी, सुनिता पाटील, डी. वाय. गोरे, संतोष भडांगे, अनिल पाटील, संतोष महाजन यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार शांताराम लाठे, पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण कुमावत, किरण जाधव आदींची उपस्थिती होती.

प्रारंभी शारदा देवी, स्व. किसनराव पाटील, कॅप्टन डॉ. एम. आर. लेले यांच्या प्रतिमांचे पूजन करून दीप प्रज्ज्वलन करण्यात आले. ज्ञानेश्‍वरी भामेरे व सोनल धनगर यांनी नृत्य सादर केले. कल्याणेहोळ गावच्या उपसरपंच उज्ज्वला पाटील यांचा सर्व विद्यार्थ्यांच्यावतीने गुरुजनांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. माजी विद्यार्थ्यांच्यावतीने शाळेसाठी वेबसाईट तयार करून आंतरराष्ट्रीय स्तरावर शाळेचा झेंडा फडकविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी औक्षण करून गुरुजनांना मानपत्र, स्नेहवस्त्र, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. दिवंगत गुरुजन आणि विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. विकास हिवाळे यांनी सादर केलेल्या ‘मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा’ या कवितेने सर्वांनाच मंत्रमुग्ध केले. सर्व विद्यार्थ्यांनी आपला परिचय देवून मनोगत व्यक्त केले. मधल्या सुट्टीत विद्यार्थ्यांनी आपल्या वर्गात जाऊन बेंचवर बसण्याचा आनंद घेतला. शाळेच्या खोल्या आणि फळे अन्‌ मैदान पाहून साऱ्यांच्याच गत आठवणी जाग्या झाल्या. विशेष म्हणजे सर्व मित्र आपल्या कुटूंबासह उपस्थित होते.

सामूहिक वंदे मातरम गाऊन कृतज्ञता सोहळ्याची सांगता झाली. यशस्वीतेसाठी सर्व माजी विद्यार्थी, विद्यार्थिनींनी सहकार्य केले.प्रास्ताविक ज्ञानेश्‍वर रायपुरे, सूत्रसंचालन कविता पाटील, कल्पना बनकर, राजेंद्र सोनवणे, शंकर भामेरे तर आभार स्वप्नील जैन यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here