साईमत, जळगाव : प्रतिनिधी
मी आधी जळगाव ग्रामीणमधून लढण्याची घोषणा केली होती. तथापि, आता मला मोठे पद मिळाले आहे. त्यामुळे गुलाबराव पाटील यांच्या सारख्या छोट्या माणसाविरूध्द आपण लढणार नसल्याचे प्रतिपादन शिवसेना-उबाठा उपनेते तथा धाडस संघटनेचे अध्यक्ष शरद कोळी यांनी केले. ते जळगावातील आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. पत्र परिषदेला उबाठाचे गुलाबराव वाघ, विष्णु भंगाळे, शरद तायडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
गेल्या अकरा दिवसांपासून जळगावात कोळी समाज बांधवांचे उपोषण सुरु आहे. तेथे अद्यापही एका अधिकाऱ्यांनी भेट दिलेली नाही. उपोषणस्थळी दोन मंत्र्यांनी भेट देऊनही खोटे बोलून त्यांना कोळी समाजबांधवांना फसवायचे आहे. अद्यापही न्याय आणि निर्णय दिलेला नाही. त्यामुळे उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित झालो असल्याचे ते म्हणाले. सरकार आम्हाला कसे घेते हे आम्हाला माहिती नाही. मात्र, कोळ्याची पोरे खवळली तर त्यांना कोणीच थांबवू शकत नाही, हे सरकारला माहिती आहे. आम्ही कायद्याप्रमाणे आमचा हक्क मागत आहोत. आम्ही स्वतंत्र आरक्षणही मागत नाही. त्यात सुलभ पध्दत करा, असे सांगून जाचक अटी सुलभ करा, ही मुळात कोळी समाजाची मागणी आहे. त्यावर निर्णय न घेतल्यास राज्यात एकाही मंत्र्याला आम्ही फिरकू देणार नाही. नुसता अल्टीमेटम देणार नाही, तर ते आम्ही करुन दाखविणार. सध्याचे सरकार हे राज्याच्या जनतेचे हिताचे नसून ते केवळ उद्योजकांच्या हिताचे असल्याची टीका त्यांनी केली.
शिवसेनेचे उपनेते शरद कोळी यांनी काही दिवसांपूर्वी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या जळगाव ग्रामीण मतदारसंघात जाऊन त्यांच्याविरुद्ध २०२४ मध्ये उमेदवारी करणार असल्याची घोषणा केली होती. शरद कोळी दुसऱ्यांदा जळगावात आले तेव्हा त्यांनी आपल्या उमेदवारीबाबत युटर्न घेतला. आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या उमेदवारीचा निर्णय पक्षप्रमुख घेतील. आपल्याला शिवसेनेचे उपनेते पद मिळाल्यामुळे मी आता निवडणूक लढविणार नाही. त्यामुळे गुलाबराव पाटील यांच्याविरुध्द गुलाबराव वाघ यांना तयार केले असल्याचेही ते म्हणाले.