साईमत जळगाव प्रतिनिधी : (हेमंत काळुंखे)
आज बकरी ईद.१७ जूनला देशभरात मुस्लिम समाजाकडून बकरी ईद हा सण साजरा केला जात आहे.त्याची तयारी जळगाव शहरासह जिल्ह्यातही पूर्ण झाली आहे. मुस्लिम बांधवांकडून वर्षभरातील दोन महत्त्वाचे सण साजरे केले जातात ज्यात रमजान ईद आणि बकरी ईदचा समावेश आहे. रमजान ईद झाल्यावर सुमारे ७० दिवसांनी बकरी ईद साजरी केली जाते मात्र बकरी ईद साजरी करण्याबाबत आणि कुर्बानी देण्याचा एक इतिहास आहे, ज्याचा कुराणमध्ये उल्लेख करण्यात आला आहे.त्यानुसार कुर्बानीची तयारी सात-आठ दिवस अगोदरच केली जाते.जळगावात शनिवारी गुरांचा बाजार भरतो त्यामुळे १५ जून रोजीच कुर्बानीचा बोकड खरेदीसाठी बाजारात एकच गर्दी उसळल्याचे दिसून आले.सकाळी सात वाजेपासून तर दुपारी १ वाजेपर्यंत बोकड खरेदी-विक्रीसाठी झुंबड उडाली.
जळगावच्या बाजारात बकरी ईदनिमित्त स्पेशल कुर्बानीसाठी पाचशेच्या वर बोकडे विक्रीसाठी आले होते. त्यात जळगाव शहरासह जिल्ह्यातून ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केल्याचे दिसून आले.या बाजारात लक्ष वेधून घेत होते ते,सुनसगाव येथील त्रिमुर्ती गोट फार्मच्या ‘सोजिक’ आणि ‘गुजरी’ बोकड्यांनी. धडधाकड सोजिक बोकडा सुमारे १०० किलो वजनाचा होता व त्याची किंनत ६० ते ६५ हजार रुपये होती तसेच सोजिक बोकडेही ५०-६० किलोचे होते व त्याची किंमत ३० ते ३५ हजार रुपयापर्यंत होती.त्यांना जास्त मागणी होती मात्र अनेक ग्राहक भावात जमले नाही म्हणून परतत होते पण विक्रेत्यांनी पहिल्या टप्प्यात तरी तडजोड केली नाही.याशिवाय जळगावातील शेरा चौकातील अनिस पटेल यांनी विक्रीसाठी आणलेला ‘बरबरा’ हा बोकडही साऱ्यांचे आकर्षण ठरला. त्याचबरोबर ममुराबाद येथील राहुल कोळीने आणलेल्या बोकड्यांनीही भाव खाल्ल्याचे दिसून आले.
याशिवाय पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड,यावल तालुक्यातील फैजपूरसह जिल्ह्यातील अनेक गावातून पाचशेवर ‘कुर्बानी’ बोकड विक्रीसाठी आले होते.याशिवाय खाटिकांंंनीही व्यवसायासाठी लागणारे बोकड खरेदीसाठी गर्दी केली होती.सकाळी ११ वाजेपर्यंत तर बाजारात पायी चालणेही मुष्कील झाले होते.औद्योगिक वसाहतीतील कृऊबाच्या गुरांच्या बाजाराच्या प्रवेशव्दारापासून दुतर्फा बोकड विक्रेत्यांनी व खरेदीदारांनी गर्दी केल्याने एकच झुंबड उडाली.शनिवारच्या बाजारात एकाच दिवसात लाखोंची उलाढाल झाल्याचे दिसून आले.कुर्बानीचा बाजार म्हणून हा परिसर दुमदुमला.
कुर्बानीचा असा इतिहास
कुराणमध्ये असलेल्या उल्लेखानुसार इस्लाम धर्मातील प्रमुख पैगंबरांपैकी हजरत इब्राहिम यांचा उल्लेख करण्यात येतो तसेच मुस्लिम धर्मात हजरत इब्राहिम यांच्यामुळेच कुर्बानी देण्याची परंपरा सुरू झाली. त्याचे झाले असं की, अल्लाहने एकदा हजरत इब्राहिम यांच्या स्वप्नात येऊन त्यांची सर्वांत प्रिय वस्तू कुर्बान करण्यास सांगितले. दरम्यान बऱ्याच विचार केल्यावर त्यांना आपला एकुलता एक मुलगा सर्वाधिक प्रिय असल्याचे कळाले.अल्लाहच्या मर्जीसमोर कुणाचे काहीही चालत नाही, असा विचार करत इब्राहिम आपल्या मुलाची कुर्बान देण्यासाठी त्याला घेऊन निघाले. मला बळी देताना पाहून तुमच्या मनात प्रेम जागे होईल म्हणून मुलाने आपल्या वडिलांच्या डोळ्यावर काळी पट्टी बांधली. काही वेळाने त्यांनी हातातील तलवारीने जोराने मुलाच्या गळ्यावर वार करून त्याची कुर्बानी दिली मात्र डोळ्यांवरील पट्टी हटवल्यानंतर त्यांंना त्यांचा मुलाच्या जागी ‘दुंबा’ म्हणजेच मेंढा कुर्बान झाल्याचे दिसले कारण अल्लाहने त्यांच्या मुलाच्या जागी मेंंढा ठेवून त्यांच्या मुलाची कुर्बानी घेतली नाही तसेच हा सर्व प्रकार इब्राहिम यांच्या परीक्षेचा भाग होता. तेव्हापासून कुर्बानी देण्याची प्रथा मुस्लिम समाजात सुरू झाली, अशी आख्यायिका आहे.
बोकड्याला वर्षभर खुराक
सुनसगाव येथील त्रिमुर्ती गोट फार्मचे संचालक सचिन चितोडिया म्हणाले की,आम्ही वर्षभर कुर्बानीच्या बोकड्यांच्या पालनपोषणाचे नियोजन करतो.यंदा १०० किलोचा गुजरी तर ६० किलोचा सोजिक बोकडा हे ‘कुर्बानी’ चे आकर्षण ठरले आहे.किंमतीत आम्ही तडजोड करत नाही.भलेही आम्ही परत फार्मवर घेऊन जातो.बोकड्याला वर्षभर वडाची पाने, हरभरा,मक्का,गहू असे खाद्य देत असल्याचेही त्यांनी सांगितले.
यंदा खरेदीदार कमी -विक्रेते जास्त
बाजारातील झुंबड पाहिल्यावर जळगावचे अनिस पटेल यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, बाजारात गर्दी झाली असली तरी यंदा विक्रेते जास्त आणि खरेदीदार कमी असे झाले आहे.आपण विक्रीसाठी आणलेला ‘बरबरा’ हा कुर्बानी बोकडा खूप दुर्मिळ आढळतो.त्यामुळे त्याचा भावही जास्त असतो.
त्यागाची ईद
बकरी ईद याच सणाला ईद-उल-जुहा म्हणतात ज्याचा अर्थ ‘त्यागाची ईद’ असा आहे. या दिवशी मुस्लीम बांधव एकत्र येऊन ईदची नमाज अदा करतात सोबतच या दिवशी इस्लामिक मान्यतेनुसार मुस्लिम समाजात बकऱ्याची कुर्बानी दिली जाते म्हणून त्याला बकरी ईद संबोधले जाते.
