पूर्णपात्रे माध्यमिक विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

0
38

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

इनरव्हील क्लब ऑफ चाळीसगावच्या माध्यमातून काकासाहेब पूर्णपात्रे माध्यमिक विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी चाळीसगाव येथील अंतरंग मानसिक समुपदेशन केंद्राच्या संचालिका आणि इनरव्हीलच्या पास्ट डिस्ट्रिक्ट चेअरमन जुलेखा शुक्ल यांच्या मार्गदर्शनाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी त्यांनी अत्यंत सोप्या भाषेत आणि प्रभावी शैलीत विद्यार्थ्यांशी संवाद साधुन त्यांना यशाचा मंत्र दिला.

दहावीचे वर्ष म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा आहे. काहीतरी करून दाखविण्याची उर्मी, अंगात सळसळता उत्साह, मनात संभ्रम आणि मानसिक तणाव अशा संमिश्र भावनांच्या हिंदोळ्यातून विद्यार्थी जात असतात. परीक्षेत चांगले गुण मिळविण्याचे दडपण, ते न मिळाल्यास येणारे नैराश्य, त्यातून होणाऱ्या आत्महत्या असे प्रकार आपण दरवर्षी बघतो. अशावेळी अपयशाने खचून जाऊ नका, पालकांना आपले मित्र समजा, मनातील प्रत्येक गोष्ट आपल्या आई-वडिलांशी बोला, त्यांच्यापासून काहीही लपवू नका, असा सल्ला जुलेखा यांनी मुलांना दिला.

याप्रसंगी इनरव्हील क्लब ऑफ चाळीसगावच्या अध्यक्षा डॉ.शुभांगी पूर्णपात्रे, सचिव डॉ.रोहिणी सुतवणे, डॉ.शीतल भोकरे, श्रद्धा महाजन आदींची उपस्थिती होती. ह्या उपक्रमामुळे विद्यार्थी निश्चितच डोळसपणे आणि समंजसपणे भावी आयुष्यात पाऊले उचलतील, असा विश्वास शाळेचे मुख्याध्यापक पारस परदेशी यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here