साईमत जळगाव प्रतिनिधी
जळगांव जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्याचा विचार करत, राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत, जिल्ह्यातील १७१ गावांतील २०५ जलस्रोतांमध्ये नायट्रेटचे प्रमाण जास्त असल्याचे आढळल्याने तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
दरवर्षीप्रमाणे भूजल विभागाने जिल्ह्यातील १४८७ गावांतील २५०७ पाणीस्रोतांची तपासणी केली. या तपासणीतून असे दिसून आले की अनेक जलस्रोतांमध्ये नायट्रेटचे प्रमाण सुरक्षित मर्यादेपेक्षा जास्त आहे. ही गंभीर बाब समोर आल्याने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता भोगावडे यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली.
पालकमंत्री पाटील यांनी स्पष्ट केले की, “प्रत्येक नागरिकाला शुद्ध आणि सुरक्षित पाणी मिळाले पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्यास धोका होऊ देता कामा नये.” त्यांनी “शुद्ध पाणी, सुरक्षित आरोग्य” हे शासनाचे धोरण अंमलबजावणीसाठी तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. दूषित जलस्रोतांचे पुन्हा नमुने घेऊन तातडीने परीक्षण करण्याचे तसेच सध्या १०७ गावांमधील २०५ जलस्रोत बंद करून पर्यायी स्रोताद्वारे त्या गावांना सुरक्षित पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करावा याबाबत सूचना दिल्या.
गावातील पाणीपुरवठा टाक्या व जलस्रोतांचे निर्जंतुकीकरण करून परिसर स्वच्छ करण्यात यावे, असे निर्देश दिले. प्रत्येक ग्रामपंचायतींनी परिसर स्वच्छ ठेवून टीसीएलचा वापर करून पाणी स्वच्छ करण्यास प्राधान्य द्यावे. पाणीपुरवठा अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ग्रामपंचायतींसोबत समन्वय ठेवून तातडीने उपाय योजनांबाबत अंमलबजावणी करावी.
विशेषतः शेतकरी बांधवांनी नायट्रेट प्रदूषणाचे दुष्परिणाम लक्षात घेता पारंपारिक युरियाचा कमी वापर करून केंद्र सरकारने अनुमोदित केलेल्या नॅनो युरियाचा वापर वाढवावा, असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.