शाळकरी मुले आणि ज्येष्ठ नागरिक भयग्रस्त; प्रभाग ७ मध्ये कुत्र्यांचा टोळक्याचा प्रादुर्भाव
साईमत/जळगाव/प्रतिनिधी
प्रभाग क्रमांक ७ मधील विविध वसाहतींमध्ये भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या नागरिकांसाठी गंभीर चिंता निर्माण करत आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्याच्या उद्देशाने नगरसेविका अंकिता पाटील यांनी महापौर दीपमाला काळे यांच्याकडे तातडीने कारवाई करण्याबाबत निवेदन सादर केले आहे.
नगरसेविकांच्या निवेदनानुसार, प्रभागातील शिवकॉलनी परिसरातील गट क्रमांक ६० व १४, वर्धमान हावट्स परिसर, आशाबाबा नगर आणि आर.एम.एस. कॉलनी येथे भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या कुत्र्यांमुळे नागरिक दररोज भीतीच्या वातावरणात राहावे लागत असून रस्त्यावरून ये-जा करताना असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
विशेषतः शाळेत जाणारी लहान मुले, सकाळ-संध्याकाळ फिरणारे ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना कुत्र्यांच्या टोळक्यामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी कुत्र्यांच्या वावरामुळे झोपेत व्यत्यय येत असून भुंकण्याचे आवाज नागरिकांना त्रस्त करीत आहेत. तसेच वाहनचालकांसाठीही अचानक रस्त्यावर येणाऱ्या कुत्र्यांमुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.काही ठिकाणी कुत्र्यांनी नागरिकांच्या मागे धाव घेणे आणि चावा घेण्याच्या घटनाही घडल्याने परिसरात भयाचे वातावरण पसरले आहे.
नगरसेविका अंकिता पाटील यांच्या निवेदनात महानगरपालिकेला त्वरित भटक्या कुत्र्यांचे लसीकरण, निर्बिजीकरण आणि सुरक्षित पुनर्वसन करण्यासाठी निर्बंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने तत्काळ आणि ठोस पावले उचलणे आवश्यक असल्याचे नगरसेविकांनी ठामपणे ठरवले आहे.
