
जिल्हा परिषद मराठी शाळेतील निष्काळजीपणाचा प्रकार समोर आला आहे.
साईमत/धानोरा, ता.चोपडा/प्रतिनिधी :
मोहरद या आदिवासी गावातील जिल्हा परिषद मराठी शाळेतील निष्काळजीपणाचा प्रकार समोर आला आहे. शाळेत नियुक्त असलेल्या चार शिक्षकांपैकी तब्बल तीन शिक्षक एकाच दिवशी रजेवर गेल्याने व शाळा वेळेवर उघडत नसल्याची माहिती मिळताच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कबीर तडवी यांनी संतप्त होऊन शाळेला कुलूप ठोकले होते. हा प्रकार प्रसारमाध्यमांमध्ये झळकताच शिक्षण विभाग तात्काळ जागा झाला.
यासंदर्भात मंगळवार दि.२ रोजी सकाळी चोपडा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अजित पाटील, अडावद बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी राजमल महाजन आणि केंद्रप्रमुख राकेश पाटील यांनी मोहरद शाळेला भेट देऊन पाहणी केली. त्यांच्या येण्यापूर्वीच दोन शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी रजा रद्द करून हजेरी लावलेली दिसली. पाहणीदरम्यान गटशिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधित शिक्षकांची चांगलीच कानउघाडणी करत शिस्त आणि जबाबदारीची जाणीव करून दिली.
शाळेतील शिस्तभंग, शाळा वेळेत न उघडणे, विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होणारे परिणाम या सर्व बाबींविषयी अधिकाऱ्यांनी गंभीर भूमिका घेतली. शाळा आवारात स्वच्छतेकडे दुर्लक्ष, परिपाठ न घेणे, वेळेवर हजेरी न लावणे याबाबतही अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. पुढील काळात शाळा वेळेत उघडणे आणि बंद करणे याचे फोटो सकाळ-संध्याकाळ कार्यालयात पाठविण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच एका महिन्यात शाळेतील गुणवत्ता सुधारली नाही तर कठोर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला.
मोहरद शाळेतील हा ढिसाळ कारभार नवीन नाही. नुकतीच बिरसा मुंडा जयंती साजरी होत असताना शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कबीर तडवी यांना कार्यक्रमाला डावलण्यात आले होते. शिक्षकांचे वर्तन, शाळेतील निष्क्रियता आणि ग्रामस्थांकडे दुर्लक्ष यामुळे ते अत्यंत नाराज आहेत. या शाळेतील भोंगळ कारभाराविरुद्ध लवकरच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करणार, असे कबीर तडवी यांनी ‘दै.साईमत’शी बोलताना स्पष्ट केले.
मोहरद शाळेतील ही परिस्थिती बदलण्यासाठी आता शिक्षण विभाग पुढील पावले कोणती उचलतो याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.


