पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शुभारंभ; २ कोटी ९७ लाखांच्या प्रकल्पातून पीडितांना मिळणार एकाच छताखाली कायदेशीर, समुपदेशन व पोलीस मदत
साईमत/ जळगाव/ प्रतिनिधी
जिल्ह्यातील महिला व बालकांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या तक्रारींचे जलद व संवेदनशील निवारण व्हावे या उद्देशाने जिल्हा पोलीस दलाच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या ‘भरोसा सेल व समुपदेशन केंद्र’ाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन आज (दि. ८) उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या परिसरात आयोजित या कार्यक्रमात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विधिवत भूमिपूजन करण्यात आले.
या केंद्राच्या माध्यमातून अत्याचारग्रस्त महिला व बालकांना एकाच छताखाली कायदेशीर मार्गदर्शन, मानसिक समुपदेशन तसेच पोलीस मदत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे पीडितांना तक्रार नोंदविताना आणि आपली बाजू मांडताना सुरक्षित व विश्वासार्ह वातावरण मिळणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी या प्रकल्पाची माहिती देताना सांगितले की, ‘भरोसा सेल’ इमारत आधुनिक सोयी-सुविधांनी सुसज्ज असणार असून, महिला व बालकांच्या तक्रारींचे संवेदनशीलतेने निवारण करण्यासाठी हे केंद्र महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. सामाजिक सुरक्षिततेच्या दृष्टीने हा उपक्रम जिल्ह्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या प्रकल्पासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून एकूण २ कोटी ९७ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली आहे. इमारतीचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभाग, जळगाव यांच्या देखरेखीखाली करण्यात येणार असून चाळीसगाव येथील ‘जगन्नाथ इन्फ्रा’ कंपनीमार्फत हे काम पूर्ण केले जाणार आहे. कार्यकारी अभियंता राहुल पाटील आणि उपविभागीय अधिकारी सुनील देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली बांधकामाचे नियोजन करण्यात आले आहे.
या सोहळ्याला अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड तसेच जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांच्यासह शहरातील विविध पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी महिला व बालकांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनाने घेतलेल्या या सकारात्मक पुढाकाराचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांनी केले.
