साईमत, जामनेर : प्रतिनिधी
शहरातील पोदार जिनियस इंटरनॅशनल स्कुल येथे अखंड महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाला संस्थाध्यक्ष प्रकाश पाटील उपस्थित होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.उमाकांत पाटील, प्रल्हाद बोऱ्हाडे, वासुदेव माळी उपस्थित होते.
शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत, नृत्य, नाट्य, ऑर्केस्ट्रा, शिवाजी महाराजांचे जीवन कार्यावर नृत्य सादर करून प्रेक्षकांची दाद मिळविली. तसेच छत्रपती शिवरायांचा जन्म ते राज्याभिषेक दाखविणारे नृत्य कार्यक्रमाचे आकर्षण ठरले. विविध संस्कारक्षम व मनोरंजक सांस्कृतिक कार्यक्रमाच्या सादरीकरणामुळे प्रेक्षकांच्या कौतुकाच्या उत्स्फूर्त टाळ्याही मिळविल्या. इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी प्रांजली माळी हिने शिवरायांची महती सांगणाऱ्या वीर रसातील भाषणाने, प्रेक्षकांची मने जिंकून प्रशंसा मिळविली.
कराटे स्पर्धेत शाळेतील यश प्राप्त केलेली गुणवंत विद्यार्थिनी दिव्या साबळे ही राज्यस्तरावर यशस्वी झाल्याने पुढील फेरीसाठी निवड झाल्याबद्दल सुवर्ण पदक व प्रशस्तीपत्र देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला स्वराज्य प्रतिष्ठान संचालित पोदार जीनियस इंटरनॅशनल स्कुलचे अध्यक्ष प्रकाश पाटील, उपाध्यक्षा शिल्पा पाटील, सचिव डॉ.विजया पाटील, सहसचिव अशोक सोनवणे, कोषाध्यक्ष प्रमिला पाटील तसेच संचालक भीमराव पाटील, पंढरी पाटील, उदय पाटील, प्रज्ञा पाटील, डॉ. नंदलाल पाटील, डॉ.निलेश पाटील आदी उपस्थित होते. शाळेचे प्राचार्य डॉ. दीपक गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला.
यशस्वीतेसाठी शाळेच्या सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. दीपक गोसावी, सूत्रसंचालन उमेश निंबोळकर तर आभार सविता अधिकार यांनी मानले.