सत्य धर्मावर आधारित विधी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करणार
साईमत/जामनेर/प्रतिनिधी
येथील सत्यशोधक समाज संघातर्फे महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी जे.बी.चौधरी होते. याप्रसंगी पवन माळी, प्रवीण तायडे, सदाशिव चवरे, दीपक अहिरे यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.
प्रास्ताविकेत कैलास महाजन यांनी कार्यक्रमाचा उद्देश आणि सत्यशोधक समाज संघाविषयी माहिती दिली. सत्यशोधक समाज संघाचे जळगाव जिल्हा सचिव रमेश वराडे यांनी मनोगतात महात्मा फुले लिखित सार्वजनिक सत्यधर्मात सांगितलेल्या विविध धार्मिक विधी संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. लवकरच जामनेर शहरात सार्वजनिक सत्य धर्मावर आधारित विधी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात येईल, अशी माहिती दिली. जामनेर शहरातील सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र गोरे यांनी सामाजिक क्षेत्रात काम करत असताना आलेले स्व-अनुभव कथन केले. तसेच समाजात काम करताना वेगवेगळ्या अडचणींवर मात करून कशी वाटचाल करावी, त्याविषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर सुभाष माळी, दीपक माळी, नरेंद्र पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
सत्यशोधक समाज संघाच्या वाटचालीविषयी मार्गदर्शन
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शहरातील सामाजिक कार्यकर्ते किशोर तायडे यांनी छत्रपती शिवराय, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीआई फुले या महापुरुषांच्या कार्याची माहिती सांगुन सत्यशोधक समाज संघाच्या वाटचालीविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष जे.बी.चौधरी यांनी मनोगतात महात्मा फुले यांना अपेक्षित असलेल्या सत्यशोधक समाज संघ समजावून सांगितला. अनिल माळी यांनी मनोगत व्यक्त करत इथून पुढे आमच्या घरी सर्व विधी सत्यशोधक समाज संघाच्या मार्गदर्शनाखाली पार पडतील, असे आश्वासन दिले. तसेच त्यांनी उपस्थितांचे आभार मानले.