शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये हरित सेनेतर्फे जनजागृती करण्यात आली.
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
येथील खुबचंद सागरमल विद्यालयातर्फे मकरसंक्रांती सणाच्या पार्श्वभूमीवर नायलॉन मांजा वापरामुळे होणारे धोके लक्षात घेऊन शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये हरित सेनेतर्फे जनजागृती करण्यात आली. यावेळी नायलॉन मांजामुळे पक्षी, माणसे व प्राणी जखमी होतात. तसेच पर्यावरणाचे मोठे नुकसान होते. याबाबत मुख्याध्यापक योगीनी बेंडाळे यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली.
नायलॉन मांजा वापरणे कायद्याने गुन्हा असून त्यासाठी दंड व शिक्षा होऊ शकते, याची जाणीव करून दिली. तसेच विद्यार्थ्यांनी कागदी, कापसाची किंवा पर्यावरणपूरक मांजा वापरण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी “नायलॉन मांजा वापरणार नाही व इतरांनाही वापरू देणार नाही” अशी प्रतिज्ञा घेतली.
शाळा परिसरात नायलॉन मांजा वापराविरोधात फलक लावून जनजागृती करण्यात आली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन व सामाजिक जबाबदारीची भावना निर्माण झाली. यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका योगीनी बेंडाळे, कल्पना देवरे, राष्ट्रीय हरित सेना प्रमुख प्रवीण पाटील, अजय पाटील, मंगला सपकाळे आदी शिक्षकांनी सहकार्य केले.
