चाळीसगावला तहसील कार्यालयावर सेवानिवृत्त कामगारांचा शुक्रवारी महामोर्चा

0
21

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

ई.पी.एस.-९५ राष्ट्रीय संघर्ष समिती आणि राष्ट्रीय सेवानिवृत्त कामगार संघर्ष समिती, चाळीसगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सेवानिवृत्त कामगारांच्या मागण्यांसाठी समिती प्रमुख ज्येष्ठ पत्रकार किसनराव जोर्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ज्येष्ठ कामगार नेते (समिती कार्याध्यक्ष) जे. एन. बाविस्कर यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी, १२ जानेवारी रोजी तहसील कार्यालयावर महामोर्चाचे आयोजन केले आहे.

सेवानिवृत्त कामगारांना दरमहा किमान ७ हजार ५०० रुपये पेन्शन व महागाई भत्त्यासह लागू करा, वृध्द पती-पत्नीस मोफत वैद्यकीय सुविधा द्या, सर्वोच्च न्यायालयाचे निकालानुसार भेदभाव न करता सर्वांना हायर पेन्शन द्या व त्यासाठी भरावी लागणारी रक्कम मिळणाऱ्या पेन्शन वाढीच्या एरीयर्समधून समायोजन करण्यात यावी, वंचित झालेल्या सर्वांना किमान ५ हजार रुपये पेन्शन द्या आदी मागण्यांसाठी महामोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चाला नेताजी चौकातील कामगार भुवन येथून सकाळी ११ वाजता सुरुवात होऊन घाट रोड, आडवा बाजार, शिवाजी घाटमार्गे तहसील कचेरी येथे समारोप होणार आहे.

समितीच्यावतीने मोर्चे, धरणे आंदोलन केले. परंतु केंद्र सरकारने फक्त आश्‍वासन दिले. यापलिकडे वृध्द पेन्शनरांच्या पदरात काहीही टाकले नाही. म्हणून रास्ता रोको आंदोलनात सर्व खासगी क्षेत्र, सार्वजनिक क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र, वीज मंडळ, सहकारी बँका, एस. टी. महामंडळ, बेलगंगा कारखाना कर्मचारी, मिल कामगार या क्षेत्रातील सर्व चाळीसगाव तालुक्यातील सेवानिवृत्त पेन्शन धारकांनी महामोर्चात प्रचंड संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन किसनराव जोर्वेकर ज्येष्ठ पत्रकार (समिती प्रमुख), जे. एन. बाविस्कर ज्येष्ठ कामगार नेते (समिती कार्याध्यक्ष), भिकन देशमुख अध्यक्ष, उत्तमराव जाधव जनरल सेक्रेटरी, ए.बी.देशमुख सहसचिव, एन.एल.जाधव, हिंमत देसले, डी.पी.मोरे उपाध्यक्ष, प्रकाश जाधव खजिनदार, महादू चौधरी संघटन सचिव, भास्करराव चव्हाण ज्येष्ठ सल्लागार, एकनाथ पाटील सल्लागार आदी पदाधिकारी, सदस्य यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here