मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांची लाभणार उपस्थिती, १७६०.४० कोटींच्या विविध विकास कामांचाही होणार प्रारंभ
साईमत/अमळनेर/प्रतिनिधी
मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानातंर्गंत अमळनेरात शुक्रवारी, ११ ऑक्टोबर रोजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींचा सन्मान सोहळा तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती अभियान अंतर्गत महिला बचत गट सदस्यांचा भव्य मेळावा आयोजित केला असल्याची माहिती कॅबिनेट मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्रीफडणवीस, ना.अजित पवार यांची उपस्थिती राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. हा मेळावा प्रताप महाविद्यालयात दुपारी १ वाजता होणार आहे. यावेळी महत्त्वपूर्ण विविध विकास कामांचाही प्रारंभ होणार आहे.
यावेळी प्रमुख उपस्थिती केंद्रीय श्रीमती रक्षाताई खडसे, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, महिला व बालविकास मंत्री अदिती ठाकरे, खा. स्मिताताई वाघ यांची उपस्थिती लाभणार आहे. मेळाव्याची प्रताप महाविद्यालयात जय्यत तयारी सुरू आहे. यासाठी सर्व महिला भगिनींना अतिशय सन्मानाने घरपोहच पत्र पाठवून निमंत्रण दिले जात आहे. बजेट अधिवेशनात उपुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहिण योजनेची घोषणा केल्यानंतर मंत्री अनिल पाटील यांनी अमळनेर मतदासंघांत एकही महिला योजनेपासून वंचित राहू नये. तसेच अर्ज भरताना त्यांची फिरफिर व आर्थिक लूट होऊ नये, यासाठी शहरात नगरपरिषद तर ग्रामीण भागात ग्रामपंचायत, अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून विविध ठिकाणी सुविधा केंद्र उभारल्याने लाभार्थी महिलांची सोय होऊन अमळनेर मतदासंघात शंभर टकके महिला भगिनीचे अर्ज भरले जाऊन त्या पात्र ठरल्या आहेत. त्याशिवाय त्यांच्या खात्यावर तीन ते चार हफ्त्यांचे पैसे पडल्याने त्या आर्थिक सक्षम होऊन विशेष करून ग्रामीण भागात आर्थिक उलाढाल वाढली असल्याचे मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले.
मेळावा मोठ्या उत्साहात होणार
मेळाव्यात लाभार्थी महिला भगिनीचा सन्मान होऊन त्यांच्याशी तसेच महिला बचत गटाच्या सदस्यांशी हितगुज व्हावे. तसेच त्यांच्या इतर काही अडचणी असतील तर त्याही समजून घ्याव्यात, यासाठीच मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री स्वतः येत आहे. हा मेळावा मोठ्या उत्साहात होणार असल्याचे मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले.