साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
येथील मंगळग्रह सेवा संस्था आणि जळगाव गोदावरी फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने श्री मंगळग्रह मंदिरात शुक्रवारी, २७ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० ते दुपारी ३ वाजेच्या दरम्यान भव्य मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया महाशिबिराचे आयोजन केले आहे. शिबिरासाठी नावनोंदणी श्री मंगळग्रह मंदिर येथे २३ ऑक्टोबरपर्यंत रोज सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत होईल.
शिबिरात फक्त मोतीबिंदू आहे किंवा नाही याबाबतच मोफत तपासणी होईल. चष्म्यांचे नंबर काढून मिळणार नाहीत. त्यासाठी कृपया कोणीही येऊ नये. ज्या शिबिरार्थींची मोतीबिंदू शस्त्रक्रिया (ऑपरेशन) करावे लागेल त्यांना शिबिरस्थळीच शस्त्रक्रियेची तारीख कळविली जाईल. ज्यांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया करावयाची आहे त्या व्यक्तींसह त्यांच्यासोबत येणाऱ्या व्यक्तीलाही गोदावरी फाउंडेशन, जळगाव येथे नेण्याची तसेच तेथे भोजनाची व्यवस्था मोफत केली जाईल. गोदावरी फाउंडेशन, जळगाव येथून मात्र स्वखर्चाने परत यावे लागेल. एखाद्या रुग्णाला उच्च रक्तदाब, शुगर किंवा अन्य काही त्रास झाल्यास त्यांना गोदावरी हॉस्पिटल, जळगाव येथेच मोफत उपचारार्थ एक दिवस ठेवले जाईल.
शिबिराचा लाभ घेण्यासाठी नावनोंदणी आवश्यक आहे. तसेच महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या लाभासाठी पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड व आधारकार्ड सोबत आणावे. कोणतेही कार्ड नसले तरी शिबिराचा लाभ मिळेल. शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन मंगळग्रह सेवा संस्थेचे विश्वस्त मंडळ, गोदावरी फाउंडेशनतर्फे केले आहे.
