गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान उपक्रम
साईमत/ जळगाव/ प्रतिनिधी
सामाजिक बांधिलकीच्या ध्येयाने प्रेरित होऊन गुरुकुल कॉलनी येथे ८ मार्च २०२६ रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे विशेष महत्त्व हे आहे की ते परमपूज्य श्री गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आले असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन सामाजिक उपक्रमाला साथ द्यावी, असे आयोजकांनी आवाहन केले आहे.
शिबिराचे आयोजन श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांच्या वतीने करण्यात आले असून, सकाळी ८ वाजता सुरू होऊन दुपारी २ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. रक्तदात्यांसाठी आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आयोजकांचा मुख्य उद्देश म्हणजे गरजू रुग्णांना रक्ताची मदत मिळावी आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातून जीवनदानाचा संदेश पसरवणे.
या उपक्रमात इंडियन रेडक्रॉस जळगाव यांनी सहकार्य केले आहे. शिबिरात प्रमुख उपस्थित डॉक्टर म्हणून डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी व त्यांच्या तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपस्थित राहणार आहे. तसेच डॉ. नरेंद्र सोनार यांचे मार्गदर्शन आणि वैद्यकीय तपासणी देखील शिबिरात केली जाणार आहे.
शिबिराच्या आयोजनासाठी डॉ. विनोद शहा, ललित भारंबे, ममता शहा यांचे सहकार्य लाभले असून, गुरुकुल कॉलनी केंद्रातील सर्व सेवेकरी शिबिर यशस्वी करण्यासाठी सक्रियपणे काम करत आहेत. या उपक्रमात केंद्र प्रतिनिधी सुनंदा चौधरी तसेच पंच कमिटी सदस्य सुभाष चौधरी, दिलीप इंगळे, जितेंद्र फालक, भारती पाटील आणि सेजल चौधरी यांचा सहभाग राहणार आहे.
शिबिराचे ठिकाण गुरुकुल कॉलनी, क्राऊन बेकरीच्या मागे, सेंट जोसेफ स्कूलजवळ, एम. जे. कॉलेज रोड, जळगाव येथे आहे. रक्तदानासाठी येणाऱ्या नागरिकांना संपूर्ण मार्गदर्शन आणि सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
आयोजकांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, “रक्तदान हे सर्वोत्तम दान मानले जाते. आपल्यामुळे एखाद्याचे प्राण वाचू शकतात. या भावनेतून पुढे येऊन रक्तदान करा.”
या शिबिरामार्फत जळगावमध्ये सामाजिक सेवा आणि जीवनदानाची प्रेरणा लोकांमध्ये रुजविण्याचा उद्देश ठेवण्यात आला आहे, ज्यामुळे शहरातील नागरिकांची सामाजिक जबाबदारी अधिक दृढ होईल.
