ग्रामसेवक निलंबनाचा आदेश यावल पंचायत समितीच्या दप्तरात

0
54

साईमत, यावल : प्रतिनिधी

जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून यावल तालुक्यातील एका ग्रामसेवकाला निलंबित करण्याचा आदेश यावल पंचायत समितीच्या कार्यालयात प्राप्त झाला आहे. परंतु यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी याप्रकरणातील फिर्यादीला अंधारात ठेवून कारवाई दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचे यावल तालुक्यासह जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात चर्चिले जात आहे.

सविस्तर असे की, तालुक्यातील एका ग्रामपंचायतीचे सरपंच यांच्या डिजिटल स्वाक्षरीचा दुरुपयोग केला आहे. संबंधित ग्रामसेवकाने सरपंच व त्या ग्रामपंचायत सदस्यांना विश्‍वासात घेतलेले नाही. त्यामुळे पंधरावा वित्त आयोगातील अंदाजे ७ ते ८ लाख रुपयांचा निधी आपल्या सोयीनुसार खर्च करून गैरप्रकार भ्रष्टाचार केला आहे. दप्तरी दाखल असलेल्या बिलाप्रमाणे नेमक्या त्याच वस्तू ग्रामपंचायत कार्यालयात आहे किंवा नाही? आणि इतर कारभाराची चौकशी करण्याची तक्रार एका महिला माजी सदस्याने केली होती आणि आहे. त्या तक्रारीची दखल घेऊन चौकशी व कारवाई पूर्ण करून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गेल्या ८ दिवसांपूर्वी ग्रामसेवकाला निलंबित करण्याचे आदेश यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांना दिले आहेत. परंतु, यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी अद्यापपर्यंत त्या ग्रामसेवकाला निलंबित का केले नाही? तसेच निलंबन आदेशाची प्रत फिर्यादीला का दिली नाही? तसेच गंभीर प्रकरणाची माहिती प्रसिद्धी माध्यमांपासून लपवून ठेवल्याने आणि कारवाई होत नसल्याने जळगाव जिल्हा परिषद आणि यावल पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रासह राजकारणात जोरदार चर्चा सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here