स्मशानभूमीतील बांधकाम ओट्यासाठी ग्रा.पं.सदस्याचे ‘भीक मांगो आंदोलन’

0
27

साईमत, पहुर, ता. जामनेर : वार्ताहर

पहूर कसबे येथील हिंदू स्मशानभूमीतील बैठक ओट्याचे अर्धवट बांधकाम पूर्ण होण्यासाठी शुक्रवारी, २१ जून रोजी सायंकाळी ६ वाजता ग्रामपंचायत सदस्य विक्रम घोंगडे यांच्या नेतृत्वाखाली ‘भीक मांगो आंदोलन’ करण्यात आले. यावेळी पहूर कसबे ग्रामपंचायतीसमोर महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.

पहुर कसबे येथील हिंदू स्मशानभूमीतील बैठक ओट्याचे बांधकाम ठेकेदार आणि अधिकाऱ्यांनी संगनमताने निधी काढून हे काम अर्धवट सोडून दिले आहे. यासंदर्भात गेल्या १० दिवसांपूर्वी जळगाव जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे लेखी तक्रार दिलेली आहे. मात्र, अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही. तसेच रखडलेले काम पूर्ण करण्याचे कोणतेही पाऊल उचलण्यात आलेले नाही. त्यामुळे नाइलाजाने संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या लेखी निवेदनात आवाहन केल्याप्रमाणे विक्रम घोंगडे यांनी व्यथित होऊन लोकशाही मार्गाने शुक्रवारी ‘भीक मांगो आंदोलनाला’ सुरुवात केली. आंदोलनात विष्णू घोंगडे, सुरेश घोंगडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

शोकाकुल बांधवांची गैरसोय दूर होणार

पहूर कसबे गावात तसेच लेले नगर, महात्मा फुले नगर, शिवनगर, महेंद्र नगर, अयोध्या नगर आदी भागात भीक मागून काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या बांधकाम व ओट्यामुळे स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी येणाऱ्या गावासह बाहेरगावातील शोकाकुल बांधवांची होणारी गैरसोय दूर होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here