सेवानिवृत्तीबद्दल शाळेतर्फे निरोप समारंभाचा कार्यक्रम
साईमत/जामनेर/प्रतिनिधी
तालुक्यातील टाकरखेडा येथील जि.प.मराठी शाळेचे ग्रेडेड मुख्याध्यापक तथा शांतीसुत म्हणून परिचित असलेले प्रभाकर तुकाराम पाटील (पी.टी.पाटील) हे प्रदीर्घ सेवेनंतर नुकतेच सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्तीबद्दल शाळेतर्फे निरोप समारंभाचा कार्यक्रम नुकताच घेण्यात आला. अध्यक्षस्थानी मिराबाई पाटील होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी आर. ए. लोहार, मलकापूर येथील शिक्षण विस्तार अधिकारी नंदकिशोर शिंदे, केंद्रप्रमुख संजय पाटील, विकास वराडे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्ज्वलन करुन ईशस्तवन, स्वागत गीताने करण्यात आली. उपस्थित मान्यवरांचा शाळेतर्फे स्वागत तथा सत्कार करण्यात आला.
टाकरखेडा शाळेचे उपशिक्षक रामेश्वर आहेर यांची बदली झाल्याबद्दल तसेच तळेगाव शाळेचे उपशिक्षक नंदकिशोर शिंदे यांची मलकापूर येथे शिक्षण विस्तार अधिकारी पदावर पदोन्नती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार टाकरखेडा शाळेतर्फे तसेच शहापूर केंद्रातर्फे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कपडे तसेच भेटवस्तू देऊन करण्यात आला. याप्रसंगी गंगाधर बारी, जयंत शेळके, जयश्री पाटील, विजय पाटील, कैलास महाजन, नाना धनगर, निर्मला महाजन, छाया पारधे, राजेश्वरी राजपूत, युवराज सुरळकर आदी मान्यवर मंडळींनी निरोपार्थीबद्दल मनोगत व्यक्त केले. तसेच निरोपार्थी ग्रेडेड मुख्याध्यापक पी.टी.पाटील, मलकापुरचे शिक्षण विस्तार अधिकारी नंदकिशोर शिंदे, उपशिक्षक रामेश्वर आहेर यांनीही मनोगत व्यक्त केले.
यांची लाभली उपस्थिती
कार्यक्रमाला शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्षा रूपाली उघडे, उपाध्यक्ष सोनाली गोसावी, सदस्य डॉ. देवानंद डाकोरकर, शिवाजी डोंगरे, सुभाष भोई, हुसेना तडवी, शिक्षणतज्ज्ञ तथा पोलीस पाटील समाधान पाटील, देवाजी पाटील, रवींद्र चौधरी, हरिदास उघडे, अंगणवाडी सेविका व मदतनीस, शहापूर केंद्रातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, प्रशिक्षणार्थी सर्व शिक्षक उपस्थित होते. यशस्वीतेसाठी शालेय व्यवस्थापन समिती, टाकरखेडा शाळेचे सर्व शिक्षक, शहापूर केंद्रातील सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन जयश्री पाटील तर आभार नाना धनगर यांनी मानले.