Nashik Municipal Corporation : नाशिक मनपा प्रभाग रचनेसाठी शासनाची तीन महिन्यांची ‘डेडलाइन’

0
13

दोन दिवसांपासूनच तयारी सुरु : २९ ऑगस्टला अंतिम प्रभाग रचना

साईमत/नाशिक/प्रतिनिधी :

नाशिक महानगरपालिकेला शासनाने तीन दिवसांपूर्वी प्रभाग रचनेचे काम करण्याचे आदेश दिले असता पुन्हा शासनाने महानगरपालिकेला आदेश देत प्रभाग रचना तयार करण्याचे टप्पेच ठरवून दिले आहेत. नऊ टप्प्यात महानगरपालिका प्रशासनाला प्रभाग रचनेचे काम करावे लागणार आहे. प्रगणक गटाच्या मांडणीस सुरूवात झाली आहे. सोमवारी, १६ जूनपर्यत याकरिता अवधी दिला आहे. दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांकडून २९ ऑगस्ट २०२५ रोजी अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाईल. प्रभाग रचनेचे काम ११ जून ते ४ सप्टेंबर कालावधीत होणे अपेक्षित आहे. तसे निर्देशच शासनाच्या नगरविकास खात्याने महानगरपालिकेला दिले आहेत. प्रभाग रचनेसंदर्भात शासनाने कालबध्द कार्यक्रमांतर्गत घालून दिलेल्या कालावधीत टप्पेनिहाय कामाची कार्यवाही पूर्ण करायची आहे. यामध्ये बुधवारपासून प्रगणक गटाची मांडणीला सुरवात केली आहे. शासनाने मनपाला निर्देश देताच कार्यवाहीला वेग आला आहे.

नाशिक महानगरपालिकेसाठी यंदाही चार सदस्यांचाच प्रभाग असणार आहे. प्रभाग रचनेसंदर्भातील कामाची जबाबदारी मनपा आयुक्त मनीषा खत्री यांच्याकडे असणार आहे. जनगनणेची प्राप्त माहिती तपासणे, स्थळ पाहणी, गुगल मॅपद्वारे प्रभागाचे नकाशे तयार करणे, प्रत्यक्ष प्रभागात जाऊन हद्दी तपासणे, प्रारूप प्रभाग रचनेच्या मसुद्यावर समितीने स्वाक्षऱ्या करणे आदी कामे १७ जून ते ७ जुलै दरम्यान केली जातील. त्यापुढे प्रारुप प्रभाग रचनेचा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाला सादर केला जाईल. त्यावेळी आयोगाने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांकडून प्रारुप प्रभाग रचनेस मान्यता देण्यात येईल. २२ ते ३१ जुलै दरम्यान प्रारूप प्रभाग रचना जाहीर करुन त्यावर हरकती मागविल्या जातील. नंतर आयोगाने नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याकडून हरकतींवर सुनावणी घेतली जाईल. १२ ते १८ ऑगस्ट दरम्यान सुनावणीनंतर हरकती व सूचनांवरील शिफारशी विचारात घेऊन प्राधिकृत अधिकाऱ्यांनी तयार केलेली प्रभाग रचना निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी पाठवली जाईल. त्यानंतर १९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या कालावधीत आयोगाकडून अंतिम प्रभाग रचना जाहीर केली जाईल.

राजकीय पुढाऱ्यांच्या लागल्या नजरा

शासनाने प्रभाग रचना तयार करण्यासाठी टप्पेनिहाय कालावधी नाशिक महानगरपालिका प्रशासनाला ठरवून दिल्यानंतर प्रशासनाकडून त्यादृष्टीने कामे करण्यास सुरवात केली आहे. प्रभाग रचनेत काही बदल होणार की नाही, याकडे राजकीय पुढाऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here