साईमत, यावल : प्रतिनिधी
येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मदत व पुनर्वसन मंत्री ना.अनिल पाटील यांची नुकतीच अमळनेर येथे भेट घेतली. भेटीत यावल तालुक्यातील नैसर्गिक आपत्तीत नुकसानग्रस्त पीडित कुटुंबांना लवकरात लवकर आर्थिक मदत मिळावी, म्हणून मागणी केली.त्यानंतर ना.अनिल पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना शासनाकडून भरीव मदत मिळवून द्यावी, अशा सूचना दिल्या आहेत.
यावल तालुक्यातील आंबापाणी येथील थोरपाणी आदिवासी पाड्यावर गेल्या २४ मे २०२४ रोजी वादळामुळे घर कोसळून एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला होता. त्यासंदर्भात महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना.अनिल पाटील यांच्याकडे कुटुंबाला तात्काळ मदत मिळावी, म्हणून यावल येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी मागणी केली. त्या मागणीला प्रतिसाद देत तत्काळ यावलच्या तहसीलदार, जिल्हाधिकारी आणि मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन कक्षाला तात्काळ सूचना देऊन लवकरात लवकर त्या कुटुंबांना मदत मिळवून देण्याचे आदेश दिले आहेत. त्यात नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून प्रत्येकी ४ लाख रुपये तर मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी १ लाख अशी २० लाख रुपयांची मदत ही त्या पीडित कुटुंबियांच्या वारसांना देण्याबाबत संबंधित विभागांना सूचना देण्यात आल्या आहेत.
या घटनेनंतर सर्व स्तरातून राजकीय, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पीडित कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले होते. त्यात यावल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही अमळनेर येथे जाऊन मंत्री ना.अनिल पाटील यांची भेट घेऊन पीडित कुटुंबाला लवकरात लवकर मदत देण्यासाठी विनंती केली.
याप्रसंगी यावल राष्ट्रवादी काँग्रेसचे ॲड.देवकांत पाटील, राष्ट्रवादी विद्यार्थीचे जिल्हाध्यक्ष राकेश सोनार, राष्ट्रवादी सामाजिक विभागाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र सपकाळे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राकेश पाटील, कोरपावलीचे सरपंच तथा सामाजिक आघाडी तालुकाध्यक्ष विलास अडकमोल, चुंचाळे येथील छत्रपती फाऊंडेशनचे संचालक विनोद पाटील, वराडसीम येथील ग्रा.पं.सदस्य विलास पाटील, भुसावळचे राष्ट्रवादीचे माजी युवक अध्यक्ष अतुल चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते.