साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील तांबोळा खुर्द येथील तितुर-डोंगरी नदीपात्रात समाज मंदिरासमोरच सुरेश साळुंखे यांच्या शेतालगत रोजच मुरूम व वाळूचे जेसीबीने उत्खनन व ट्रॅक्टरद्वारे वाहतूक सुरूच आहे. येथे नियुक्त तलाठी व मंडळ अधिकारी हे दरमहा न चुकता शासनाकडून ५ ते ६ आकडी पगार मोजून घेतात. त्या मोबदल्यात त्या परतफेडीत तांबोळी खुर्द नदी पात्रात सुरू असलेल्या मुरूम वाळूच्या अवैध विना रॉयल्टी उत्खनन व वाहतूक याकडे मात्र अर्थ पूर्णपणे दुर्लक्ष करतात. मुरूम वाळूने भरलेले ट्रॅक्टर हे हवाई मार्गे तर जात नसणार ना? येथे नियुक्त तलाठी व मंडळाधिकारी यांच्या डोळ्यांना मोतीबिंदू सदृश्य आजार जडलाय का? त्यांचे कर्तव्य व कर्तव्य प्रती असलेले उत्तरदायित्व निभावण्यासाठी त्यांना उसने अवसान भाडेतत्त्वावर घ्यावे लागेल का? आणि त्याचा मुहूर्त अजून गवसत नाही का? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.
कर्तव्यदक्ष तहसीलदार प्रशांत पाटील यांनी आमसभेत कर्मचाऱ्यांप्रती केलेले वक्तव्य हे बिनचूक आहे का? कारण एकीकडे कारवाई शून्य? तर दुसरीकडे मुरूम व वाळू उत्खनन व चोरीचा रोजच जोर व शिरजोर वाढत आहे? तेथे नियुक्त महसूल शासनाचे कर्मचारी व अधिकारी मूग गिळून निव्वळ बघायची भूमिका घेत आहेत. त्यामुळे तांबोळा खुर्द वासिय नागरिक कार्यवाहीच्या प्रतीक्षेत आहे.