नाभिक समाज बांधवांना व्यवसाय साहित्याच्या किटचे वितरण
साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी :
येथे संत शिरोमणी सेना महाराज सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन मुक्ताईनगर महाराष्ट्र शासनातर्फे विविध समाजहिताच्या अनेक योजना हाती घेतल्या आहे. शासन समाजाच्या विकासासाठी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन आ.चंद्रकांत पाटील यांनी केले. मुक्ताईनगर येथे संत शिरोमणी सेना महाराज सामाजिक सभागृहासाठी ५० लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. आ.चंद्रकांत पाटील यांच्यातर्फे पुन्हा २० लाखांचा निधी देण्यात येणार आहे. अशा सामाजिक सभागृहाच्या भूमिपूजनाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नाभिक हितवर्धक संस्थेचे रामा टोंगे होते. याप्रसंगी आ.चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उपस्थित बांधवांना नाभिक व्यवसाय साहित्याचे किटचे वितरण करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष रवींद्र नेरपगार, जगदीश सोनवणे, तालुकाध्यक्ष गणेश टोंगे, आमदारांचे स्वीय सहाय्यक प्रवीण पाटील, कडू सनांसे, राजू टोंगे, विजय टोंगे, सुनील श्रीखंडे, किशोर हातकर, नितीन चव्हाण यांच्यासह जिल्ह्याभरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
आ.चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुलींना शंभर टक्के उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. ‘लाडकी बहिण योजना’ ‘लखपती दीदी’ त्यासोबतच युवकांनाही व्यवसायाभिमुख योजना सुरू करण्यात आल्या आहेत. विविध योजना शासनातर्फे सुरू केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सहकार्यातूनच विविध सामाजिक सभागृहांना निधी मुख्यमंत्र्यांच्या सहकार्यातूनच देण्यात येत आहे. नाभिक समाज हा सेवा देणारा समाज आहे. सार्वजनिक वापरासाठी तसेच इतर समाजासाठीही एक हक्काचे सभागृह असावे, अशा भावनेतून सामाजिक सभागृहासाठी निधी मंजूर केला आहे. अशाप्रकारे महाराष्ट्र शासन सामाजिक विकासासाठी कटीबद्ध आहे. त्या माध्यमातून मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी हातभार लावण्याचा सर्व नागरिकांच्या आशीर्वादाने प्रयत्न करत असल्याचेही आ.चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
याप्रसंगी मतदारसंघासह जिल्ह्यातील सर्व नागरिक, समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक तालुकाध्यक्ष गणेश टोंगे, सूत्रसंचालन नरेंद्र महाले तर आभार श्री.लोंढे यांनी मानले.