शेतकऱ्यांना हमीभावाचा दिलासा, खासगी व्यापाऱ्यांची पिळवणूक थांबणार
साईमत/पारोळा/प्रतिनिधी :
शहरात श्री बालाजी कोटेक्स जिनिंग ॲण्ड प्रेसिंग येथे भारतीय कापूस निगम लिमिटेडच्या वतीने शासकीय कापूस खरेदी केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. या केंद्राचे उद्घाटन आ.चिमणराव पाटील व नगराध्यक्षा नलिनी चिमणराव पाटील यांच्याहस्ते झाले.
शासकीय कापूस खरेदी केंद्रामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचा कापूस थेट शासनाच्या आधारभूत हमी किमतीनुसार खरेदी केला जाणार आहे. त्यामुळे खासगी व्यापाऱ्यांकडून होणारी पिळवणूक थांबवून शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा योग्य दर मिळणार असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.
हा उपक्रम शेतकरी बांधवांच्या आर्थिक हितासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार असल्याचा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला. उद्घाटनप्रसंगी तालुकाप्रमुख मधुकर पाटील, ग्रेडर इंद्रप्रकाश लहाटा, सिद्धार्थ सिंग, श्री बालाजी कोटेक्स जिनिंग ॲण्ड प्रेसिंगचे संचालक दयाराम पाटील, संजय पाटील, भगवान मोरे यांच्यासह परिसरातील अनेक शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या केंद्राच्या माध्यमातून कापूस खरेदी प्रक्रिया पारदर्शक राहणार असून शेतकऱ्यांना वेळेत पैसे मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे आगामी कापूस हंगामात शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
