नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १५ दिवसात शासकीय मदत द्यावी

0
8

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी

तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी गेल्या १२ डिसेंबर २०२३ रोजी सक्षम पुराव्यासहित तहसील कार्यालयात लेखी निवेदन दिले होते. त्यानंतर गेल्या १० जानेवारी २०२४ रोजी तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषणास बसले होते. मात्र, शासनाने त्याची काही दखल घेतली नाही. म्हणून शेतकऱ्यांनी २०२१ मध्ये अतिवृष्टी, अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे ३३ टक्क्याच्यावर नुकसान झाले होते. त्या संदर्भ तारखेला सक्षम पुराव्यानिशी लेखी निवेदन दिले आहे. परंतु साधारण २७ महिन्याचा दीर्घ कालावधी उलटला तरीही शेतकऱ्यांना अद्याप शासकीय मदत मिळालेली नाही. म्हणून दु:खी होऊन सर्व शेतकरी कार्यालयासमोर १८ जानेवारी २०२४ पासून ते १९ जानेवारी २०२४ पर्यंत शासकीय कामाच्या दिवशी सकाळी ११ वाजेपासून ते सायंकाळी चार वाजेपर्यंत साखळी उपोषणास बसले होते. परंतु शासन व प्रशासन स्तरावर कोणतीच दखल घेतली गेली नाही. म्हणून त्यांनी साखळी उपोषण स्थगित केले आहे. येत्या पंधरा दिवसात शेतकऱ्यांना शासकीय मदत न मिळाल्यास शेतकरी येत्या ७ फेब्रुवारी २०२४ नंतर कोणत्याही दिवशी व कोणालाही पूर्व सूचना न देता मदत व पुनर्वसन मंत्री आ.अनिल पाटील यांच्या अमळनेर स्थित कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा दिला आहे.

संबंधित मंत्र्यांना आणि संबंधित वरिष्ठ सर्व अधिकाऱ्यांना कळविण्याची आपली व्यक्तिगत जबाबदारी राहील. तसेच आंदोलनाच्या काळात आचारसंहिता लागू झाल्यास त्याला आम्ही शेतकरी जबाबदार राहणार नाही, याची शासकीय नोंद घ्यावी. लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आमरण उपोषणाच्या वेळी शेतकऱ्यांचे जीवितांचे काही बरे वाईट झाल्यास किंवा राजकीय दबावातून पोलीस प्रशासनाकडून आमच्यावर गुन्हे दाखल झाल्यास त्याला शासन, प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील, असा स्पष्ट इशारा अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here