गुलालाची उधळण अन्‌‍ प्रचंड उत्साहात पाचव्या दिवशी बाप्पाला निरोप

0
43

साईमत, चोपडा : प्रतिनिधी

शहरासह तालुक्यात तरुणांमध्ये प्रचंड गुलालाची उधळण आणि प्रचंड उत्साह, जोशपूर्ण वाजंत्रीच्या निनादात गणपती उत्सव साजरा करण्यात येत आहे. अशातच चोपडा शहरात पाचव्या दिवशी ‘श्रीं’चे विसर्जन करण्यात आले. शहरातील जवळपास ६१ सार्वजनिक गणेश मंडळातर्फे ‘श्रीं’ना भावपूर्ण निरोप देण्यात आला. यावर्षी ५० च्यावर गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून १५ फुटांपेक्षा जास्त उंचीच्या मूर्ती होत्या. त्यामुळे नेहमीपेक्षा यंदा मिरवणुका उशिरापर्यंत चालल्या.

मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष यांचा गणपती सर्वात प्रथम सकाळी नऊ वाजताच विसर्जन मार्गावरून मार्गस्थ होत असतो. जवळपास १८ ते २० तास चालणारी ही मिरवणूक खऱ्या अर्थाने सायंकाळी पाच वाजेपासून सुरू होते. तालुकाभरातून ग्रामीण भागातील प्रचंड भाविक भक्त विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी आले होते. त्यामुळे गर्दीला उधाण आलेे होते. शहरातील अरुंद गल्ल्यांमुळे मिरवणुकीला खोळंबा निर्माण झाला होता. यावर्षी शांतता कमिटीच्या बैठकीत पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी रात्री १२ वाजेनंतर वाजंत्री वाजवली तर गुन्हे दाखल होतील आणि कोणतीही वाजंत्री वाजविता येणार नाही, असा इशारा दिला होता. गणपती विसर्जन मिरवणुकीचा मार्ग आशा टॉकीज, गोल मंदिर, चावडी, बोहरा गल्ली, मुस्तफा बाबा मशीद, आझाद चौक, पाटील दरवाजा, बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बस स्टँड अशा मार्गे नेहमीप्रमाणे शांततेत पार पडली. खऱ्या अर्थाने गणपती विसर्जनाची मिरवणूक बोहरा गल्लीमध्ये रेंगाळत असते. त्याठिकाणी गणपती मंडळे लवकर पास होत नाही. त्यामुळे यंदा चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांनी मंडळांना सहकार्य करण्याचे आवाहन केले होते.

पोलीस बंदोबस्तामुळे शहराला छावणीचे स्वरूप

चोपडा शहरातील मिरवणुकीला गालबोट लागू नये, म्हणून पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली चोपडा शहरात चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांनी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे शहरात छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. शहरातील गणपती मिरवणूक निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी शहर पोलिसांना शांतता कमिटीचे सर्व सदस्य, सर्वपक्षीय प्रमुख नेते, पत्रकार, सर्व पक्षाचे पदाधिकारी, पोलीस पाटील संघटना, पोलीस मित्र, शहरातील प्रतिष्ठित नागरिक यांच्यासह ग्रामीण पोलीस स्टेशनचे अधिकारी, पोलीस कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here