नागपूर :
महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ मधील पदसंख्येसंदर्भातील शुद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. प्रस्तुत परीक्षेमधून एकूण ८१७० ऐवजी ८२५६ पदांची भरती करण्यात येईल.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ३० एप्रिल, २०२३ रोजी आयोजित महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट- क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ (जाहिरात क्रमांक ००१/२०२३) करीता दिनांक २० जानेवारी, २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये तसेच दिनांक २८ जून, २०२३, ७ जुलै, २०२३ व दिनांक ८ ऑगस्ट, २०२३ रोजीच्या शुद्धिपत्रकानुसार भरावयाच्या एकूण ८१७० पदांचा समावेश करण्यात आला होता. दिनांक ८ ऑगस्ट, २०२३ रोजीचे शुद्धिपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्यानंतर शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या १० ऑगस्ट, २०२३ तसेच सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक २५ ऑगस्ट, २०२३ रोजीच्या पत्राद्वारे अनुक्रमे लिपिक- टंकलेखक व सहायक कक्ष अधिकारी संवर्गाकरीता सुधारित पदसंख्येची मागणीपत्रे प्राप्त झाली आहेत. त्यामुळे ७ जुलै, २०२३ रोजीचे अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या सुधारित पदसंख्येचे शुद्धिपत्रक याद्वारे अधिक्रमित करण्यात येत आहे.
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ परीक्षेमधून भरावयाच्या विविध संवर्गातील एकूण ८२५६ पदांकरीता भरतीप्रक्रिया राबविण्यात येईल. प्रस्तुत परीक्षेकरीता विविध मंत्रालयीन प्रशासकीय विभागातील सहायक कक्ष अधिकारी गट-ब तसेच अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागातील लिपिक-टंकलेखक संवर्गाचा नियुक्ती प्राधिकारी निहाय सुधारित तपशिल आहे.