Good News : आनंदाची बातमी : जळगाव जि.प.तर्फे विद्यार्थ्यांसाठी मोफत अभ्यासिका

0
7

जि.प.च्या २० टक्के सेस फंडातून उभारली अभ्यासिका, विद्यार्थ्यांना मिळणार दर्जेदार सुविधा

साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

शहरात अभ्यासासाठी शांत वातावरण मिळावे, म्हणून अभ्यासिकांमध्ये प्रवेशाच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यातील काही अभ्यासिकांमध्ये शुल्क आकारुन सुविधा पुरविण्यात येतात. या अभ्यासिकांचा स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात लाभ घेतात. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा परिषदेतर्फे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी मोफत व वातानुकुलीत अभ्यासिकेची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.

जिल्हा परिषदेच्या २० टक्के सेस फंडातून विद्यानिकेतन शाळा, जी.एस. ग्राउंड येथे ही वातानुकुलीत अभ्यासिका उभारली आहे. ही सुविधा सर्व विद्यार्थ्यांसाठी खुली असणार आहे. ही अभ्यासिका विद्यार्थ्यांना शांत, सुरक्षित व प्रेरणादायी वातावरणात अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन देणारी ठरणार आहे. येथे ६० विद्यार्थ्यांपर्यंत एकत्र बसण्याची क्षमता आहे. २४ तास वीज सुविधा, स्वच्छ पिण्याचे पाणी, प्रशस्त बैठक हॉल व वातानुकुलीत व्यवस्था यामुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार सुविधा मिळणार आहे.

जि.प.च्या सीईओंनी संकल्पनेतून घेतला पुढाकार

जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून ही अभ्यासिका सुरु केली आहे. यासंदर्भात त्या म्हणाल्या की, विद्यार्थ्यांना योग्य अभ्यासाची जागा, सोयी-सुविधा व मनास अनुकूल वातावरण मिळाले पाहिजे, त्याच उद्देशाने जिल्हा परिषदेच्या निधीतून अभ्यासिका साकारली आहे. सुविधेचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

अभ्यास संस्कृती वृद्धिंगत होण्यास निश्चितच लागेल हातभार

शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी, जिल्हा परिषदेच्या विद्यानिकेतन शाळा परिसरात अभ्यासिका सुरु केली आहे. अभ्यासासाठी उत्सुक, परीक्षेची तयारी करणारे, स्पर्धा परीक्षांचे स्वप्न पाहणारे आणि अभ्यासात सातत्य ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही अभ्यासिका उपयुक्त ठरणार आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी हे वातावरण केवळ शैक्षणिक दृष्ट्या नव्हे तर मानसिक दृष्ट्याही सकारात्मक ऊर्जा देणारे असेल, असा विश्वास जिल्हा परिषदेने व्यक्त केला आहे. अशा उपक्रमामुळे जिल्हा परिषदेच्या शैक्षणिक विकासाच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. यामुळे अभ्यास संस्कृती वृद्धिंगत होण्यास निश्चितच हातभार लागेल.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here