विठ्ठलाच्या चरणी माथा टेकून
मुक्ताई पालखी माघारी
साईमत/ न्यूज नेटवर्क/ मुक्ताईनगर :
पंढरपुरात दरवर्षी विठ्ठलाच्या दर्शनासाठी कोथळी मुक्ताईनगर येथून मुक्ताईबाईची पालखी जात असते. आषाढी एकादेशीला लाखो भाविकांनी जावून विठ्ठलाचे दर्शन घेतले. तसेच संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांकडून भगिनी आदिशक्ती मुक्ताबाईस साडीचोळी भेट देण्याचा ऐतिहासिक भावनिक सोहळा शनिवारी झाला. 21 जुलै रोजी सकाळी गोपाळपुऱ्यात पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. रवींद्र हरणे महाराज यांचे गोपाळकाला व काल्याचे कीर्तन होवून भगवान श्रीविठ्ठल दर्शन घेवून पालखीने निरोप घेऊन दुपारी माघारी मुक्ताईनगरच्या दिशेने निघाली.
गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर मुक्ताबाई पादुकांना मंत्रोच्चारात पंचामृत अभिषेक पूजा करण्यात आली. पंढरपुरात मुक्ताईचे पालखी गुरूपौर्णिमेला विठ्ठलाचे सर्व वारकरीचे दर्शन झाल्याचा आनंद सर्व वारकऱ्यांना आहे. मुक्ताईला साडीचोळी देण्याचा सोहळा झाला आहे. रविवारी मुक्ताईकडे विठ्ठलाचे दर्शन घेवून पालखी निघाली आहे.
टाळ मृदुंगाच्या गजरात अवघे मुक्ताईनगर न्हाऊन निघणार
मुक्ताई पालखी सोहळा भीमातीर ते तापीतीर असा मुक्काम दर मुक्काम विसावे घेत 9 ऑगस्ट रोजी सायंकाळी नवीन मुक्ताई मंदिर, मुक्ताईनगर येथे पोहचेल. 10 ऑगस्ट रोजी नवीन मुक्ताई मंदिर ते जुनी कोथळी समाधी स्थळ मंदिर असा मुक्ताईनगर शहरातून भव्य पालखी चा स्वागत सोहळा होणार आहे. त्यात वारकरी दिंडी स्पर्धा व टाळ मृदुंगाच्या गजरात अवघे मुक्ताईनगर न्हाऊन निघणार आहे.
विठ्ठल, रुक्मिणी मातेस भेटीचा सोहळा
संत मुक्ताबाई यांच्या पादुकांचे श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेस भेटीचा सोहळा झाला. याप्रसंगी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने ॲड. माधवी निगडे, मुक्ताई संस्थान विश्वस्त सम्राट पाटील, पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. रवींद्र महाराज हरणे, ह.भ .प. विशाल महाराज खोले, ज्ञानेश्वर हरणे, ह.भ.प. उद्धव महाराज जुनारे, प्रज्वल महाराज, पंकज महाराज आदी वारकरी मंडळी उपस्थित होते.