साईमत, प्रतिनिधी, जळगाव
गोदावरी नर्सिंग महाविद्यालयातर्फे शनिवार दि. 12 ऑगस्टपासून सुरु झालेल्या रॅगिंग प्रतिबंधक सप्ताहानिमित्त नशिराबाद पोलिस स्थानकातर्फे विद्यार्थ्यांना रॅगिंग प्रतिबंधाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. महाविद्यालय स्तरावर रॅगिंग होऊ नये, अपराध होऊ नये, याकरिता हा उपक्रम घेण्यात आला असून येत्या 18 ऑगस्टपर्यंत असणाऱ्या या सप्ताहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार रॅगिंग करणे हा दंडनीय अपराध आहे. यानिमित्त महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्या निर्देशानुसार, गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग येथे 12 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट 2023 या कालावधीत अँटी-रॅगिंग सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. महाविद्यालयातर्फे 12 ऑगस्ट हा दिवस रॅगिंग प्रतिबंध दिवस म्हणून पाळण्यात आला.
तसेच रॅगिंग प्रतिबंधक आठवड्यासही सुरुवात झाली असून सप्ताहाच्या पहिल्या दिवशी नशिराबाद येथे पीएसआय व पोलिस कर्मचाऱ्यांनी रॅगिंगच्या नियमांबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर नर्सिंग महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा.विशाखा पी वाघ यांनी रॅगिंग म्हणजे काय, रॅगिंग समितीचे धोरण, रॅगिंगची व्याप्ती आणि स्वरूप, रॅगिंगविरोधातील कायदे, रॅगिंगला प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना आदींबाबत माहिती दिली. या कार्यक्रमात 200 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि त्यांना अँटी-रॅगिंगची संपूर्ण माहिती देण्यात आली. यासारखेच विविध उपक्रम सप्ताहभरात राबविले जाणार आहे.