मान्यतेमुळे पीएच.डी. मार्गदर्शक म्हणून प्राध्यापकांना मिळणार काम करण्याची संधी
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाला शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून नर्सिंगमध्ये पीएच.डी. संशोधन केंद्र म्हणून मान्यता मिळाली आहे. ही मान्यता नाशिक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून मिळाली आहे.त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण आणि संशोधनाचे नवीन मार्ग खुले झाले आहेत. ही मान्यता विद्यापीठाच्या २५ जून आणि २२ जुलै २०२५ च्या ठरावानुसार देण्यात आली आहे. त्यामुळे कम्युनिटी हेल्थ नर्सिंग, चाइल्ड हेल्थ नर्सिंग, मेंटल हेल्थ, सायकेट्रिक नर्सिंग, ऑब्स्टेट्रिक व गायनॅकोलॉजिकल नर्सिंग, आणि मेडिकल सर्जिकल नर्सिंग अशा विषयांमध्ये संशोधन करता येणार आहे.
महाविद्यालयातील प्राध्यापकांना मान्यतेमुळे पीएच.डी. मार्गदर्शक म्हणून काम करण्याची संधी मिळेल. तसेच विद्यार्थ्यांना संशोधनासाठी स्थानिक पातळीवरच सोयीसुविधा उपलब्ध होतील. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आता मोठ्या शहरांमध्ये जावे लागणार नाही. ज्यामुळे संशोधनाचे काम करणे सोपे होईल. ही मान्यता संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांच्या शैक्षणिक कार्याचा सन्मान आहे. त्यामुळे नर्सिंग शिक्षण आणि संशोधनाची सांगड घालून भविष्यात अधिक सक्षम आणि ज्ञानसंपन्न नर्सिंग व्यावसायिक तयार होतील. ही उपलब्धी जळगाव जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब मानली जात असल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी सांगितले.