विद्यार्थ्यांमध्ये अँटी-रॅगिंगविषयी जनजागृती करुन मार्गदर्शन
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
येथील गोदावरी नर्सिंग कॉलेजमध्ये १२ ते १८ ऑगस्ट दरम्यान ‘युथ अगेंस्ट रॅगिंग’ घोषवाक्यांतर्गत आणि ‘युनिफॉर्म ऑफ हिलिंग नॉट हर्टींग’ शीर्षकासह अँटी-रॅगिंग सप्ताह विविध उपक्रमांनी साजरा केला. कार्यक्रमात अँटी-रॅगिंग प्रतिज्ञा घेण्यात आली. सप्ताहाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये अँटी-रॅगिंगविषयी जनजागृती करणे, आपुलकी व ऐक्य दृढ करणे आणि रॅगिंगमुक्त परिसराची उपलब्धता करून देणे असा होता. सप्ताहाचा प्रारंभ प्राचार्यांच्या स्वागतपर भाषणाने झाला. त्यांनी अँटी-रॅगिंग जनजागृतीचे महत्त्व स्पष्ट केले. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. उल्हास पाटील लॉ कॉलेजच्या सहाय्यक प्राध्यापक डॉ. ललिता सपकाळे यांनी रॅगिंगचे कायदेशीर परिणामावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
विविध स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्राचे वाटप
विद्यार्थ्यांनी पोस्टर मेकिंग स्पर्धा, रिल्स मेकिंग स्पर्धा, रांगोळी आणि घोषवाक्य लेखन स्पर्धेत उत्साहाने सहभाग घेतला. तसेच अँटी-रॅगिंग जनजागृती रॅली काढण्यात आली. विद्यार्थ्यांसह प्राध्यापक व स्वयंसेवकांनी सहभाग घेऊन समाजात रॅगिंगविरोधी संदेश पोहोचविला. त्यानंतर सीनियर-ज्युनियर संवाद मेळावा आयोजित केला होता. शेवटच्या दिवशी अँटी-रॅगिंगवर आधारित लघुपटाचे प्रदर्शन, विविध स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.