सामाजिक बांधिलकीची सुंदर अभिव्यक्ती
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
येथील सी.ए. शाखेतर्फे “सेवा हीच खरी साधना” अशा भावनेतून ‘सामूहिक गोसेवा-एक अनुष्ठान’ असा अनोखा सामाजिक उपक्रम नेरीनाका जवळील पांजरापोळ गोशाळेत नुकताच पार पडला. समाजाप्रती संवेदनशील बांधिलकी व्यक्त करत जळगाव सी.ए. शाखेने गोसेवेचा उपक्रम राबविला. ॲड. विजय काबरा यांच्या सान्निध्यात उपस्थित मान्यवरांनी गोमातेला सव्वा मणी खाऊ घालून गोसेवा अर्पण केली. याप्रसंगी ‘गोमाता की जय’च्या घोषणांनी परिसर दणाणला होता. यावेळी जळगाव सी.ए. शाखेचे अध्यक्ष हितेश आगीवाल, कार्यकारी मंडळ सदस्य नचिकेत जाखेटीया, सहकारी सदस्य हितेश जैन, विजय मंत्री, विकास सेठी, सी.सी.एम.सी.ए. अर्पित काबरा उपस्थित होते.
याप्रसंगी ॲड. विजय काबरा यांचा जळगाव सी.ए. शाखेतर्फे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यांनी “सामूहिक गोसेवा-एक अनुष्ठान” विषयावर उपस्थित मान्यवरांशी संवाद साधत गोसेवेचे धार्मिक, सामाजिक व पर्यावरणीय महत्व अधोरेखित केले. शाखेच्या उपक्रमातून केवळ समाजसेवेचा नव्हे तर मूल्याधिष्ठित व्यावसायिकतेचा संदेशही दिला. सी.ए. शाखेच्या प्रयत्नाचे विविध स्तरातून कौतुक होत आहे.