साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
आपले जीवन सुंदर बनवायचे असेल, आपल्या मुलाबाळांवर-पत्नीवर जीवापाड प्रेम करत असाल तर तंबाखू, गुटखा, दारू अशा व्यसनांचा त्याग करा आणि कॅन्सरपासून दूर रहा, असे पं.प्रदीप मिश्रा यांनी उपस्थित भाविकांना सांगितले. सिनेमा पाहून व्यसनाची जशी सवय लागते. तसे चांगल्या सत्संगाने हे व्यसन का सुटू शकत नाही, असा प्रश्न करत त्यांनी व्यसनांचा त्याग करा आणि शिवजींचा जागर करा, आयुष्य सुखी होईल, असे सांगितले. एकतर हृदयात दारू राहील नाही तर शिव. आपल्या मुखातून कुणाची निंदा होणार नाही, असे आचरण आत्मसात करा, असा सल्ला त्यांनी दिला.
शेवटच्या दिवशी पं.मिश्रा यांनी भाविकांना उद्बोधन करतांना अयोध्येत २२ जानेवारी रोजी रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. हा सोहळा घरोघरी दीप प्रज्ज्वलीत करून अत्यंत उत्साहात साजरा करावा, असे आवाहन त्यांनी केले. ते म्हणाले की, प्रभूची कृपा असल्यामुळेच कथा श्रवणासाठी एवढी गर्दी झाली. ईश्वराचे चिंतन करा, सुख-दु:खात ईश्वराचीच आठवण येईल. असाह्य द्रौप्रदीला वाचविण्यासाठी अनेक रथी, महारथी असून कुणी वाचवायला पुढे आले नाही. कृष्णाने धाव घेतली. व्यक्ती आजारी पडला तर कुणी आयसीयुमध्ये असते, कुणी हॉस्पिटलमध्ये पलंगावर असतो. पण जवळचे लोक वाचविण्यासाठी येतीलच असे नाही, अशावेळी मनुष्य एकाकी पडतो, असेही ते म्हणाले.
चाळीसगाव शहरात मागील पाच दिवसांपासून महाशिवपुराण कथेचे आयोजन केले होते. पाचव्यादिवशी सकाळी ११ वाजता कथेचा समारोप झाला. पाच दिवसात लाखो भाविकांनी शिवमहापुराण कथेचे श्रवण केले. पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवपुराण महाकथेस भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, नगरचे खा.सुजय विखे पाटील, चाळीसगावचे आ.मंगेश चव्हाण, भाजपा संघटन मंत्री विजय चौधरी, पाचोरा आ.किशोर पाटील, आ.चिमणराव पाटील, पाचोऱ्याच्या शिवसेनेच्या नेत्या वैशाली सूर्यवंंशी, भुसावळचे आ.संजय सावकारे यांच्यासह मान्यवरांनी हजेरी लावली.
