साईमत/ न्यूज नेटवर्क/वरणगाव :
शहरात गेल्या ४ जून रोजी जुन्या वादाची कुरापत काढून तिघांवर चाकु हल्ला करण्यात आला होता . यामध्ये एकाचा मृत्यू झाला असुन घटनेतील पाचपैकी तीन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेतील मुख्य सुत्रधार असलेल्या दोन्ही फरार आरोपींना त्वरित अटक करून सर्वांना फाशीची शिक्षा द्या, अशा मागणीसाठी वरणगाव शहरातील मुस्लीम बांधवांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला .
वरणगाव शहरात सहा महिन्यांपूर्वी एकाच समाजातील दोन गटात वाद निर्माण झाले होते. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र, वादाची धुसपूस दोन्ही गटात धुमसत असतानांच ४ जून रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास सिनेमा रस्त्यावर ( भवानी नगर ) दुचाकीला कट मारल्याच्या कारणावरून आकीब अली कमर अली ( वय १९, रा.गौसीया नगर ) आणि राहील सईद सय्यद यांच्यामध्ये वाद निर्माण झाला. यावेळी तिघांनी चाकु व तिक्ष्ण हत्याराने आकीब अली याच्यावर चाकूने वार केले तर त्याला वाचविण्यासाठी आलेल्या आरीफ अली समदअली सय्यद व मुश्ताक अली सय्यद यांनाही गंभीर जखमी केले . या घटनेत आरीफ अली समदअली याचा मृत्यू झाल्याने या घटनेची आकीब अली कमर अली यांच्या फिर्यादीवरून वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद होताच पोलिसांनी राहील सईद सय्यद उर्फ पहेलवान व रेहान खालीद सय्यद, करीम हारून मन्यार यांना अटक केली.
या घटनेला चिथावणी व जिवे ठार मारण्याची धमकी देणारे मुख्य सुत्रधार अरबाज सय्यद उर्फ पहेलवान, मुजाहीद सय्यद उर्फ इंजिनिअर अद्यापही फरार असुन पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. घटनेनंतर शहरात शांतता निर्माण व्हावी, यासाठी पोलीस ठाण्यात पोलीस उपविभागीय अधिकारी राजकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत शांतता समितीची बैठक घेण्यात आली होती. मात्र, सद्यस्थितीतही गौसीया नगर व इस्लामपुरा भागात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे फरार आरोपींना त्वरित अटक करून घटनेतील सर्व आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशा मागणीसाठी शहरातील मुस्लीम बांधवांनी शुक्रवारी दुपारी तीन वाजता पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. मोर्चात महिलाही मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या होत्या .
विशेष सरकारी वकीलांची नियुक्ती करावी
वरणगाव शहरात युवकाची झालेली हत्या ही एक शोकांतिका आहे. या घटनेतील मुख्य सुत्रधारांना त्वरित करण्यात यावी. तसेच सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी विशेष सरकारी वकील ॲड.उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करून हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा, अशी मागणी पीआरपीचे प्रदेश महामंत्री जगन सोनवणे यांनी केली. मोर्चात जाफर अली ( हिप्पी शेठ ), मकसुद अली सिकंदर अली, अल्लाउद्दीन शेठ, शेख सईद, पप्पू जकातदार, साजीद कुरेशी, इफ्तेखार मिर्जा, अशफाक काझी, इरफान अली, शाहीद शेख यांच्यासह मुस्लीम बांधवांनी पोलीस उपविभागीय अधिकारी किरण शिंदे यांना निवेदन दिले. मोर्चेकऱ्यांनी पोलीस प्रशासनाकडे लेखी आश्वासनाची मागणी केल्याने पोलिसांच्यावतीने त्यांना लेखी आश्वासन देण्यात आले .
आरोपींचा घेतला जातोय शोध
घटनेतील फरार आरोपींचा कसुन शोध घेतला जात असुन लवकरच त्यांना अटक करण्यात येईल. फरार असलेल्या आरोपीबाबत कुणाला काही माहिती मिळाल्यास त्यांनी पोलीसांना माहीती देवून सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस उप विभागीय अधिकारी किरण शिंदे यांनी केले . मोर्चाप्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चौधरी, त्यांच्या सहकारी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.